सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढवले आहे. अनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत आहे. राज्यात १८ मेपर्यंत या आजाराच्या ९५० रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, पुणे नंतर नागपूर विभागात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे विभागात २७३ तर नागपुरात २३३ सक्रिय रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी आरोग्य विभागाने गंभीर इशारा दिला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने औषधांचाही तुटवडा पडला असून रुग्णांचे नातेवाईक प्रचंड तणावाखाली आहेत. आरोग्य विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, पुण्यात २६७ तर पुणे विभागातील तीन जिल्हे मिळून सर्वाधिक २७३ रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात १३३ रुग्ण आढळून आले असून नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून २३३, लातुर विभागातील चार जिल्हे मिळून १२८, औरंगाबाद विभागातील चार जिल्हे मिळून ८५, अकोला विभागातील पाच जिल्हे मिळून ३९, नाशिक विभागातील पाच जिल्हे मिळून ३९, ठाणे विभागातील तीन जिल्हे मिळून २२ तर कोल्हापूर विभागातील चार जिल्हे मिळून सर्वात कमी म्हणजे, १८ रुग्ण आढळून आले आहेत. तज्ज्ञाच्या मते, खासगी रुग्णालयांकडून या रुग्णांची योग्य पद्धतीने नोंदणी होत नसल्याने याच्या कित्येक पटीने अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.
-नागपूर विभागाला मिळणार ४,०५० इंजेक्शन
या आजाराच्या उपचारात महत्त्वाचे असलेले ‘अॅम्फोटीसिरीन-बी’ इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. केंद्र सरकारकडून राज्याला लवकरच १,६५,००० या इंजेक्शनचे व्हायल उपलब्ध होणार आहेत. यातून नागपूर विभागाला ४,०५० व्हायल मिळणार असून नागपूर जिल्ह्याच्या वाट्याला २५७४ येणार आहेत.
-नागपूरनंतर चंद्रपूर व वर्धेत सर्वाधिक रुग्ण
नागपूर विभागात नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४८ रुग्णांची नोंद झाली. वर्धा जिल्ह्यात ३४ तर भंडारा जिल्ह्यात ३ मुक्यरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत.
::विभागनिहाय म्युकरमायकोसिसचे रुग्ण (१८ मेपर्यंत)
:: पुणे विभाग : २७३ रुग्ण
:: नागपूर विभाग : २३३ रुग्ण
:: लातुर विभाग : १२८ रुग्ण
:: औरंगाबाद विभाग : ८५ रुग्ण
:: अकोला विभाग : ३९ रुग्ण
:: नाशिक विभाग : ३९ रुग्ण
:: ठाणे विभाग : २२
:: कोल्हापूर विभाग : १८ रुग्ण