लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील जिल्हानिहाय उपलब्ध बेड व लोकसंख्या याची तुलना केली तर नागपूरने मुंबई, पुण्यालाही मागे टाकले आहे. ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड मुंबई, पुणेच्या तुलनेत दहा लाख लोकसंख्येमागे अधिक उपलब्ध आहेत. असे असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना नागपुरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. परंतु नागपुरात शहर व ग्रामीण यासोबतच विदर्भातील जिल्हे, मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील रुग्ण उपचारासाठी येत असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या आकड्यानुसार नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख आहे. मार्च महिन्यात कोविड रूणांची संख्या वाढू लागली. एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रकोप झाला. सर्व रेकार्ड तुटले. या दरम्यान मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरातील रुग्णालयात कोविड बेड व ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याला सुरुवात झाली. अधिकाअधिक खासगी रूग्णालयात कोविड रुग्णासाठी बेड आरक्षित करण्यात आले. याशिवाय नेते, मंत्री प्रयत्नशील दिसले. परंतु त्यानतंरही रुग्णांची भटकंती झाली. राज्यातील ३६ जिल्ह्यांचा विचार करता नागपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलने प्रति दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या बेडची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या ४.६ दशलक्ष आहे. नागपुरात ऑक्सिजन नसलेले बेड १६६३२ आहेत. ऑक्सिजन असलेले ९९४४ तर आयसीयू २८०८ तर व्हेंटिलेटर बेड ९९६ आहेत. त्यामुळे सध्या नागपूर जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ३६१६ बेड उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ऑक्सिजन बेड २१६२, आयसीयू ६१०, तर आयसीयू व्हेंटिलेटर बेड २१७ आहेत.
बाहेरील रुग्णांचा शहरातील रुग्णालयावर भार
दहा लाख लोकसंख्येमागे असणारी सर्वप्रकारच्या बेडची संख्या इतर शहरांपेक्षा नागपुरात सर्वाधिक असून यामध्ये राज्यात अव्वल क्रमांक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. नागपूर नंतर मुंबई, पुणे , सांगली व मुंबई उपनगर यांचा क्रमांक लागतो. इतर शहराच्या तुलनेत नागपुरातील स्थिती चांगली आहे. इतर जिल्ह्यातील रूग्णांचा भार असल्याने व प्रकोप वाढल्याने बेड उपलब्ध होण्यात काही अडचणी आल्या. परंतु आता परिस्थिती सुधारली आहे. पहिल्या लाटेत मनपा सोबत ६६ खासगी रूग्णालये होती. मार्च अखेरपर्यंत ८८ होती यात वाढ करुन एप्रिलमध्ये १०८ पर्यंत नेली आणि एप्रिलअखेर पर्यंत १४६ कोविड रुग्णालये असल्याची माहिती जलज शर्मा यांनी दिली.