लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य विभागाने बहुप्रतिक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत सुमारे हजारांवर महापालिका व जिल्हा स्तरावरील डॉक्टर आणि लसीकरण अधिकांऱ्याना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक ३६ हजार लिटर लस साठवणूक क्षमतेची जागा आहे. पहिल्या टप्प्यात २८ हजार हेल्थ वर्करना लस दिली जाणार आहे. यांची यादी तयार झाली असून लवकरच ‘को-विन’ अॅपवर नोंदणी होणार आहे.
काही देशांमध्ये आपात्कालीन परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. भारतातही विविध लस उत्पादक कंपन्यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींसाठी आपात्कालीन परिस्थितीत लसीकरणाची परवानगी मागितली आहे. नागपूर जिल्ह्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लस येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे नियोजन सुरू झाले आहे. लॉजिस्टीक, डेटा आदींचे कार्य जवळपास झाले आहे. २८ हजार ‘फ्रंट लाईन हेल्थ वर्कर’ना पहिला डोज दिला जाणार आहे. यांची यादी दिल्ली येथील आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आली आहे. ‘को-विन’ अॅपवर त्यांची नोंदणी होणार असल्याची माहिती, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक थेटे यांनी दिली.
- १७५वर डीप फ्रिजर
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १३ ग्रामीण रुग्णालये आहेत. शहरात तीन मोठे हॉस्पिटलसह ६२ क्लिनीक आहेत. यांच्याकडे जवळपास १७५ डीप फ्रिजर आहेत. यातील ५९ डीप फ्रिजर व ५४ ‘आयएलआर’ बॉक्स महानगरपालिकेकडे आहेत.
-राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन लसीकरण तयारी प्रशिक्षण घेण्यात आले. राज्य लसीकरण अधिकारी, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, यूएनडीपीचे प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी झाले होते. या प्रतिनिधींतर्फे आता महापालिका व तालुकास्तरावरील डॉक्टर आणि लसीकरण अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
-लसीकरणाचे नियोजन केले जात आहे
लसीकरणाच्या तयारीचे ऑनलाईन प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आहे. आपल्याकडे कोणती कोरोना प्रतिबंधक लस येणार याची माहिती अद्याप नाही. लसीकरणासाठी ३६ हजार लिटर लस साठवणुकीची जागा आपल्याकडे उपलब्ध आहेत. यात डीप फ्रिजर, ‘आयएलआर’ बॉक्स आहेत. पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणाºया २८ हजार फ्रंट लाईन हेल्थ वर्करची यादी वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे.
-डॉ. दीपक थेटे
प्रभारी, जिल्हा शल्यचिकित्सक