लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्प किमतीत लाखोचे सोने देतो, असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका दाम्पत्याची एक लाख रुपयांची रक्कम हडपली. कमी किमतीत सोने मिळत असल्याच्या आमिषापोटी आपली आयुष्याची पुंजी गमावणाऱ्या या दाम्पत्याचे नाव निर्मला आणि नंदकिशोर समर्थ असे आहे. समर्थ दाम्पत्य विद्यानगर इन्द्रादेवी टाऊनमागे राहतात. ते रमणा मारोती परिसरात हातठेल्यावर भाजीपाला विकतात. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. तेथे काबाडकष्ट करून भाजीपाला आणि कापूस पिकवतात. अनेक दिवस काटकसर करून आणि यावर्षी पिकविलेला कापूस विकून त्यांनी एक लाख रुपयांची रक्कम जमा केली होती. १२ मेच्या सायंकाळी नंदकिशोर समर्थ यांना दोन आरोपी भेटले. भाजी घेण्याच्या बहाण्याने गप्पा करत त्यांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आहेत. लॉकडाऊनमुळे पैशाची अत्यंत अडचण असल्यामुळे ते अल्प किमतीत आपण विकणार आहोत असे म्हणाले. तुम्हाला लाखो रुपयांचे दागिने फक्त एक लाख रुपयात देऊ, असे आमिष आरोपींनी समर्थ यांना दाखविले. दागिने पाहिजे असल्यास आपल्याला फोन करा, असे सांगून आरोपींनी त्यांचा मोबाईल क्रमांकही समर्थ यांना दिला.लाखोंचे दागिने केवळ एक लाख रुपयांत मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडून समर्थ दाम्पत्यांनी ते विकत घेण्याची तयारी दाखवली. दागिने असली की नकली हे तपासण्यासाठी आरोपीने समर्थ यांना फोन करून काही दिवसांनंतर नंदनवनमधील खरबी चौकात गोस्वामी डेअरीजवळ बोलविले. त्यानुसार नंदकिशोर समर्थ हे दागिने बघायला तेथे गेले. आरोपींनी त्यांना एक माळ दाखवली. ती सोन्यासारखी दिसत होती. त्यातील एक मणी तोडून आरोपींनी समर्थ यांना दिला. तो खरा की खोटा, हे तुम्ही सराफांकडून तपासून घ्या, असे ते म्हणाले. त्यानुसार समर्थ यांनी तो सोन्याचा मणी आपल्या ओळखीच्या सराफाला दाखवला. तो मणी असली सोन्याचा असल्याचे सराफाने सांगितले. त्यामुळे नंतर आरोपीचा जेव्हा फोन आला, तेव्हा समर्थ यांनी ती माळ एक लाख रुपयात विकत घेण्याची तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे आरोपींनी २९ मेच्या पहाटे ५.३० ला समर्थ यांना छोटा ताजबाग परिसरात बोलविले. समर्थ दाम्पत्य एक लाखाची रक्कम घेऊन तेथे पोहोचले. समर्थ यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन त्यांना आरोपींनी त्यांच्याजवळची सोन्यासारखी माळ दिली. ही माळ घेऊन समर्थ दाम्पत्य सराफाकडे गेले असता ती सोन्याची नव्हे तर सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूची माळ असल्याचे सराफाने सांगितले. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर समर्थ दाम्पत्यांनी आरोपीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला. मात्र आरोपींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शुक्रवारी समर्थ दाम्पत्याने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार संदिपान पवार यांनी लगेच तक्रार नोंदवून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.पुन्हा वळवळते टोळीअल्प किमतीत सोन्याचे दागिने देतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या राजस्थानमध्ये सक्रिय होत्या. या टोळ्यांनी नंतर आपले फसवणुकीचे नेटवर्क संपूर्ण देशात विस्तारले. मात्र जागोजागच्या पोलिसांनी त्यांना अटक केल्यामुळे आपला हा गोरखधंदा बंद केला. नागपुरात मात्र या टोळीची पिलावळ अजूनही वळवळत असून, अधूनमधून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या बांधण्याची तयारी नंदनवन पोलिसांनी चालविली आहे.
नागपुरात सोन्याच्या आमिषाला बळी पडून गमावली आयुष्याची पुंजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 7:58 PM
अल्प किमतीत लाखोचे सोने देतो, असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका दाम्पत्याची एक लाख रुपयांची रक्कम हडपली.
ठळक मुद्देदोन भामट्यांनी केली फसवणूक : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल