नागपूर : यंदाच्या उन्हाळ्यात नागपुरात शनिवारी सर्वांत उष्ण दिवसाची नोंद झाली. तापमान शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २.२ डिग्री सेल्सिअसने वाढून ४५.४ वर पोहोचले. याआधी २९ एप्रिलला नागपुरात ४५.२ डिग्री तापमान होते, हे विशेष.
नागपुरात चार दिवसांत कमाल तापमान ३.८ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. मेच्या मध्यंतरात नागपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असल्याचे समजले जाते. वातावरण कोरडे असल्यामुळे तापमान वाढल्याचे हवामान विभागाचे मत आहे. पुढील दोन दिवस ४५ डिग्रीच्या जवळपास राहील. तापमान सामान्यापेक्षा ३ डिग्री वर गेल्यामुळे मनपा प्रशासनाने लोकांना सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत उन्हाच्या प्रत्यक्ष संपर्कात न येण्याचे आणि उन्हात जाण्यापूर्वी पर्याप्त पाणी व थंड पेयाचे सेवन करण्याचे आवाहन केले आहे. नागपुरात शनिवारी सकाळी ७.३० वाजेपासून उन्हाचा त्रास होऊ लागला होता. दुपारी १२ नंतर अनेक रस्ते निमर्नुष्य झाले होते. आकाशात पक्षी दिसले नाहीत. आवश्यक काम असणारेच दुपारी रस्त्यावर दिसत होते.
विदर्भात वर्धा शहर सर्वाधिक उष्ण होते. तापमान ४६.५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले. याशिवाय चंद्रपूर ४६.२, ब्रह्मपुरी ४५.४, यवतमाळ ४५, अकोला ४४.६, अमरावती ४४.८, गोंदिया ४३.८, वाशिम ४३.५, गडचिरोली ४१.४ आणि बुलडाण्यात कमाल तापमानाची ४०.७ डिग्री सेल्सिअस नोंद झाली.
असे वाढले तापमान :
तारीख तापमान
११ मे ४१.६
१२ मे ४१.९
१३ मे ४३.२
१४ मे ४५.४
(तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये)