नागपूर : दिवाळीला आपल्या घरी जाण्यासाठी ठिकठिकाणच्या प्रवाशांनी एकच गर्दी केल्याने गेल्या २४ तासांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. फलाटांना जोडणाऱ्या जिन्यांवर आणि वेगवेगळ्या फलाटांवर पाय ठेवायलाही जागा नाही.आपल्या कुटुंबीयांत, आपल्या गावात जाऊन दिवाळी साजरी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे नोकरीच्या, रोजगाराच्या निमित्ताने नागपूर-विदर्भात असलेले नागरिक आपापल्या परिवारातील सदस्यांसह गावोगावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर धाव घेतली आहेत. त्यामुळे येथील मुख्य रेल्वेस्थानक, अजनी आणि ईतवारी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
गर्दीचे प्रमाण एवढे जास्त आहे की फलाटांवर, प्रतिक्षालयात पाय ठेवायलाही जागा नाही. विशेष असे की, येणारी - जाणारी प्रत्येकच रेल्वेगाडी भरभरून वाहत आहे. सर्वच डब्यात प्रवासी खच्चून भरले असल्याने स्थानकावर थांबलेल्या गाडीतील प्रवाशांना फलाटावर उतरण्यासाठी वेळ देण्याचीही तसदी कुणी घेताना दिसत नाही. प्रवासी दारातून उतरण्यापुर्वीच काही जण डब्यात शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याने बाचाबाचीही होत असल्याचे दिवसभरात अनेकदा दिसून येते.
विविध मार्गावर 'फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन'दिवाळीच्या निमित्ताने विविध मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होणार ही कल्पना असल्यामुळे रेल्वेने आधीच विविध मार्गावर 'फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन' सुरू केल्या आहेत. काही रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले आहेत. मात्र तरीसुद्धा जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडीत प्रवाशांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळते. नागपूर हे असे जंक्शन आहे की येथून देशाच्या सर्वच दिशांना रेल्वे गाड्या जातात आणि येतात. त्यामुळे नागपूर स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली दिसते.