मध्यवर्ती संग्रहालय : भूतकाळ आणि वर्तमानाचे दर्शनमध्यवर्ती संग्रहालय :नागपूर : मध्यवर्ती संग्रहालयातील हेरिटेज (वारसा) दालन हे नव्यानेच निर्मित करण्यात आले असून ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. या दालनात प्राचीन काळापासून जसे महापाषाण युगापासून (२५०० ते ३००० हजार वर्षे जुने) ते ऐतिहासिक काळात निर्मित स्थापत्याचे ठळक नमुने दाखविण्यात आले आहे. यामध्ये प्राचीन काळातील शवाधान, गुफा-लेणी, मंदिरे, किल्ले, प्रवेशद्वार, भोसले-गोंड काळातील नागपूरचे स्थापत्य व सर्वात महत्त्वाचे नागपुरातील ब्रिटिश काळात निर्मित इमारतीचा समावेश आहे. नागपूरच्या प्राचीन व आधुनिक स्थापत्यासोबतच मध्यवर्ती संग्रहालयाचा १५० वर्षाच्या वाटचालीचा संक्षिप्त वृत्तांत सांगण्यात आला आहे. यामध्ये संग्रहालय निर्मितीकरिता सर रिचर्ड टेंपल व फादर हिस्लॉप यांचे योगदान कसे महत्त्वपूर्ण आहे हे समजते. याशिवाय नागपूरच्या निर्मितीकरिता भरीव योगदान केलेल्या विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती कला, क्रीडा, समाज, राजकारण व विविध क्षेत्रात विपुल प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. नागपुरातील स्वातंत्र्यलढ्याच्या योगदानाचे पुण्यस्मरण होण्याकरिता भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या नावाचे फलक लावण्यात आले आहे. सन १८५७, १९४२ च्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांचे नामस्मरण करण्यात आले आहे. काळाच्या ओघात झालेल्या बदलांचे वास्तविक चित्रण जुने आणि नवीन नागपूर या शोकेसमध्ये दर्शविण्यात आले आहे. यामध्ये सन १९६० ते १९७० च्या सुमारातील नागपुरातील भारतीय रिझर्व्ह बँक, लक्ष्मीनारायण मंदिर, नागपूर रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती संग्रहालय इत्यादी प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे भूतकाळ आणि वर्तमान या पद्धतीने दाखविण्यात आली आहेत. सोबतच नागपूरचे वैशिष्ट्य असलेल्या पिवळी व काळ्या मारबतीचे प्रतिकृती शिल्प दालनात प्रदर्शनार्थ ठेवलेले आहे. याशिवाय नागपूरची ओळख असलेल्या संत्रा व शून्य मैल स्तंभाची प्रतिकृती दालनात मांडण्यात आली आहे. एकंदरीत नागपूरचा संक्षिप्त इतिहास नागपूरचा वारसा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेच्या माध्यमातून नागपूर वारसा दालनात मांडण्यात आला आहे. नुकतेच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसचिव संजय भोकरे, अवर सचिव शै. जाधव, अवर सचिव तथा पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक प्र.म. महाजन, संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. विराग सोनटक्के, औरंगाबादचे संचालक अजित खंदारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चित्रकला दालन मध्यवर्ती संग्रहालयातील विविध वैशिष्ट्यपूर्ण संग्रहापैकी उल्लेखनीय संग्रह म्हणजे येथील चित्रकला संग्रह होय. १८ व्या व १९ व्या शतकातील भागवत पुराण, पंचरत्न गीता यासारख्या भोसलेकालीन धार्मिक सचित्र पोथ्या व भोसले घराण्यातील राजांची लघु आकारातील व्यक्तिचित्रे हा त्यातील एक संवर्ग आहे. दुसऱ्या संवर्गातील बहुतांश कलाकृती विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून सुमारे १९६० च्या दशकापर्यंतच्या आहेत. मध्यवर्ती संग्रहालय हे विदर्भात चित्रकलेचे प्रदर्शन असणारे एकमेव संग्रहालय आहे. या चित्रकला दालनाची नव्यानेच निर्मिती करण्यात आली असून चित्रांची मांडणी, प्रकाश व्यवस्था व डिस्प्ले आधुनिक पद्धतीने करण्यात आलेली आहेत. या चित्रकला दालनात रझा, डिखोळे, गायतोंडे, बाबुराव पेंटर, नगरकर, दीनानाथ दलाल या प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. याशिवाय निसर्ग चित्रे, व्यक्ती चित्रे, अमूर्त चित्रे, लघु चित्रे, समूह चित्रे, दृश्य चित्रे व ऐतिहासिक चित्रे आहेत.अंधांसाठी ब्रेल लिपीचा उपयोग अंध व अल्पदृष्टी लोकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती संग्रहालयाने पाऊल उचलले आहे. अंधांसाठी असलेल्या ब्रेल लिपीमध्ये संग्रहालयाचा इतिहास, दालनाची माहिती, पुरावशेषांची माहिती इत्यादी देण्यात आली आहे. मध्यवर्ती संग्रहालयाने यासाठी समदृष्टी क्षमता विकास व अनुसंधान केंद्र (सक्षम) यांच्या माध्यमाने हा उपक्रम राबविला आहे. ब्रेल लिपीच्या साहाय्याने अंध व्यक्ती संग्रहालयाची माहिती जाणून घेऊ शकतात. तसेच संग्रहालयाच्या दीडशे वर्षाचा इतिहास माहीत करू घेऊ शकतात. सध्या संग्रहालयातर्फे प्रायोगिक तत्त्वावर कागदाचे बुकलेट तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संग्रहालयामध्ये अशा प्रकारचा पुढाकार घेणारे नागपूर मध्यवर्ती संग्रहालय हे पहिलेच आहे.