नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचेनागपूर खंडपीठ, त्याच्याशी संबंधित न्यायमूर्ती, वकील तसेच नागपूर, अमरावती आदी मोठ्या शहरांमधील अनेक खटल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेले देशाचे ४९ वे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा शनिवारी नागपूर येथे हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने सत्कार होत आहे. या निमित्ताने न्या. लळीत यांच्या स्नेहबंधांना अनेकांनी उजाळा दिला आहे.
छत्तीसगडचे महाधिवक्ता व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विशेष सरकारी वकील राहिलेले अमरावतीचे ज्येष्ठ वकील ॲड. जुगलकिशोर गिल्डा यांचा न्या. लळीत यांच्याशी उण्यापुऱ्या छत्तीस वर्षांचा स्नेह आहे. न्या. लळीत निष्णात विधिज्ञ आहेतच. पण, त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक बांधीलकी जपणारे, मैत्री टिकविणारे व्यक्तिमत्त्व आहे. १९८६ साली अमरावतीच्या एका प्रतिष्ठित कुटुंबाशी संबंधित सिलिंग प्रकरणातील विशेष अनुमती याचिकेच्या निमित्ताने निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे ज्येष्ठ बंधू ॲड. विनोद बोबडे यांनी दिल्लीत ॲड. ए. जी. रत्नपारखी यांच्या कक्षात न्या. उदय लळीत यांचा परिचय करून दिला.
ॲड. गिल्डा म्हणतात, वकील म्हणून मानधनापलीकडे स्नेहबंध जपणारे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व ही न्या. लळीत यांची खरी ओळख. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांविरुद्धचे बदनामी प्रकरण किंवा अंबादेवी संस्थानच्या खटल्याच्या निमित्ताने व्यावसायिक संबंध तर दृढ होत गेले. ९ वर्षांनंतर सुनावणीला आलेल्या अंबादेवी संस्थान खटल्यावेळी वीस प्रकरणांमध्ये त्यांना युक्तिवाद करायचा होता. इतर प्रकरणे मोठी, अधिक मानधनाची होती तर हे प्रकरण किमान मोबदला देणारे, पण मानधनासाठी कुणाचेही मन दुखावले जाणार नाही, हे तत्त्व जपणारे विधिज्ञ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्या युक्तिवादाने घडले.
सोली सोराबजी यांच्यासाठी मोत्यासारख्या हस्ताक्षरातील नोंदी
महान्यायवादी सोली सोराबजी यांच्याकडील सरन्यायाधीश लळीत यांचा १९८६ ते १९९० दरम्यानच्या उमेदवारीचा काळ महत्त्वाचा. ॲड. हरिश साळवे, ॲड. गोपाल सुब्रम्हण्यम यांच्याप्रमाणेच सोराबजी यांची कीर्ती न्या. लळीत यांच्या रूपाने वाढली. कागदाच्या मागच्या कोऱ्या जागेत अत्यंत सुंदर, मोत्यासारख्या हस्ताक्षरात न्या. लळीत यांनी काढलेल्या नोंदी व त्यावरून सोली सोराबजी यांनी केलेला युक्तिवाद, हा अनेकांसाठी आगळा अनुभव होता. ९० च्याच दशकात नागपूर व विदर्भातील पन्नासच्या वर वकिलांशी न्या. लळीत यांचा घनिष्ट परिचय झाला. मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राला सरन्यायाधीश लळीत यांच्याबद्दल अभिमान आहेच. परंतु, निष्णात वकील म्हणून त्यांनी अन्य राज्यांमधील वकिलांनाही प्रभावित केले. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे विविध राज्यांतील वकिलांशी जवळचे संबंध निर्माण झाले, असे ॲड. गिल्डा म्हणाले.
नागपूरसोबत आत्मीय संबंध
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी सरन्यायाधीश लळीत यांचा नागपूरसोबत आत्मीय संबंध आहे, त्यामुळे त्यांचा सत्कार केला जाणार आहे, असे सांगितले. सरन्यायाधीश लळीत यांचे वडील न्या. उमेश लळीत १९७३ ते १९७५ या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. हे कुटुंब सिव्हिल लाईन्समधील सौदामिनी बंगल्यामध्ये राहत होते. त्यावेळी सरन्यायाधीश लळीत नागपूरमध्ये शिक्षण घेत होते. त्यानंतर ते मुंबईत स्थानांतरित झाले, अशी माहितीही ॲड. पांडे यांनी दिली.
नागपुरात आज सत्कार
देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने शनिवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हृद्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई समारंभाचे मुख्य अतिथी, तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर सन्माननीय अतिथी आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.