नागपूर हायकोर्टात ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:30 AM2019-01-09T00:30:41+5:302019-01-09T00:31:31+5:30
अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.
उच्च न्यायालय सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक एच. एम. सय्यद यांनी मंगळवारी काही पत्रकारांशी बोलताना सुरक्षा व्यवस्थेतील सुधारणेची माहिती दिली. पूर्वी केवळ नाव नोंदवून प्रवेश दिला जात होता. त्यामुळे बरेच जण खोटी नावे सांगून आत जात होते. ही त्रुटी लक्षात आल्यानंतर आता केवळ ओळखपत्र पाहूनच आत प्रवेश दिला जातो. कुणासोबत बॅग व अन्य काही साहित्य असल्यास त्याची कसून तपासणी केली जाते. उच्च न्यायालय इमारत व परिसरातील हालचालींचा वेध घेण्यासाठी काही पोलिसांना साध्या वेशात वावरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलीस लोकांमध्ये मिसळून धोक्यांचा कानोसा घेत असतात.
इमारतीबाहेरच्या परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सर्व कॅमेरे सुरू असून, त्यावर एक कर्मचारी बारीक लक्ष ठेवून असतो. महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता इतरांच्या वाहनांना परिसरात प्रवेश दिला जात नाही. उच्च न्यायालयाच्या सुरक्षेकरिता रोज किमान ५० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. इमारतीत प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्या प्रत्येक मार्गावर व इमारतीमध्येही ठिकठिकाणी पोलीस तैनात केले जातात, असे सय्यद यांनी सांगितले.