लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्येही तापमान ४७ डिग्री इतके होते. नागपूर आणि ब्रह्मपुरी हे रविवारी विदर्भात सर्वाधिक उष्ण राहिले.या मोसमात नागपूरचे तापमान दुसऱ्यांदा ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोले आहे. नवतपाचा आज शेवटचा दिवस होता. परंतु येत्या आठवडाभर नागरिकांना भीषण उष्णता सहन करवी लागणार आहे. हवामान विभागानेही याला दुजोरा दिला असून सोमवारी विदर्भातील बहुतांश भागात रेड अलर्ट जारी केले आहे. नवतपा लागल्यापासून नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहेत.नागपुरात नवतपाच्या चौथ्या दिवशी २८ मे रोजी कमाल तापमान ४७.५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. पाच दिवसानंतर पुन्हा तापमान ४७ डिग्रीवर पोहोचल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. पारा सरासरीपेक्षा पाच डिग्री अधिक असल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले. ढगांमुळे उकाड्यानेही त्रस्त केले होते. हवामान विभागानुसार ८ जूनपर्यंत नागपुरातील तापमान ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.३ जून रोजी नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित दिवसांसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये पारा सरासरीपेक्षा तीन ते पाच डिग्रीपेक्षा अधिक राहतो. अशा परिस्थितीत थेट उन्हात जाऊ नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रात्रीच्या तापमानात घटगेल्या २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान ६.५ डिग्रीने खाली उतरले आहे. रविवारी किमान तापमान २६.३ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.