लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरेंद्रनगरातील डॉ. पुष्पा आंबोरे (वय ६५) यांच्या निवासस्थानातून चोरट्यांनी दिवसाढवळ्या ३० तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही धाडसी चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी रात्री अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.नरेंद्रनगरातील उज्ज्वला सोसायटीत डॉ. आंबोरे यांचा बंगला आहे. तळमाळ्याला त्यांचा दवाखाना असून, तेथूनच वरच्या माळ्यावर जाण्यासाठी जिना आहे. रविवारी दुपारी १२.३० ला त्या सहपरिवार जेवण करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. दुपारी ४ च्या सुमारास त्या परत आल्या. बंगल्यात शिरताच त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या शयनकक्षातील कपाटात ठेवलेले ३० तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली होती. त्यांनी अजनी पोलिसांना कळविले. ठाणेदार शैलेश संख्ये आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. चोरट्यांनी रोकड आणि मौल्यवान चीजवस्तू शोधण्यासाठी घरातील साहित्य अस्तव्यस्त केले होते. पोलिसानी चोरट्यांचा माग काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले. आजूबाजूच्यांना विचारणा केली. मात्र, चोरट्यांबाबत कुणाकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे, डॉ. आंबोरे यांच्या निवासस्थानी किंवा इस्पितळ परिसरात सीसीटीव्ही नाही. त्यामुळे चोरटे किती होते आणि ते कधी आले किंवा गेले, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, या धाडसी चोरीत एका महिलेसह किमान चौघांचा समावेश असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.चोरलेल्या मोबाईलचा वापरएका महिलेने चोरीच्या घटनेच्या काही वेळेपूर्वी डॉ. आंबोरे यांना फोन करून त्या कधी घरी राहतील, त्याबाबत चौकशी केली होती. ही महिला पेशंट असावी, असा समज झाल्याने डॉ. आंबोरे यांनी तिला वेळ सांगितली अन् तेथेच घात झाला. दरम्यान, ज्या मोबाईलवरून महिलेने डॉ. आंबोरे यांना फोन केला होता. तो मोबाईल पाचपावलीतील एका ७२ वर्षीय वृद्धाचा असून काही दिवसांपूर्वीच तो चोरीला गेला होता, असेही पोलीस तपासात उघड झाले आहे. या एकूणच घटनाक्रमावरून चोरट्यांनी डॉ. आंबोरे यांचे निवासस्थान आणि त्यांच्या दिनचर्येचा आधीच कानोसा घेतला असावा अन् नंतर ही धाडसी चोरी केली असावी, असा कयास आहे.
नागपुरात डॉक्टरकडे दिवसाढवळ्या धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:28 AM
नरेंद्रनगरातील डॉ. पुष्पा आंबोरे (वय ६५) यांच्या निवासस्थानातून चोरट्यांनी दिवसाढवळ्या ३० तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही धाडसी चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी रात्री अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्दे३० तोळे सोने, दीड लाखांची रोकड लंपास