लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंग लागलेल्या किंवा हाताने लिहिलेल्या नोटा बाजारात कुणी स्वीकारत नाहीत. त्यामुळे नोटांवर काही लिहू नये, त्यांच्यावर रंग लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील बऱ्याच एटीएममधूनच अशाप्रकारच्या फाटक्या किंवा सदोष नोटा नागरिकांच्या हाती पडत आहेत. अशा सदोष नोटांमुळे व्यवहारात अडचणी येत आहेत. बँकांकडूनही अशा नोटा स्वीकारल्या जात नाही. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे एटीएममधून सदोष नोटा पुरवठा करण्यासाठी जबाबदार कोण, असा संताप व्यक्त केला जात आहे.लोकमत प्रतिनिधीने याबाबत सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर फेरफटका मारला असता, हा गंभीर प्रकार लक्षात आला. सदर प्रतिनिधीने एका बँकेच्या एटीएममधून १०,००० रुपये काढले. त्यावेळी एटीएममधून दोन हजाराच्या चार आणि पाचशेच्या चार नोटा निघाल्या. यापैकी एक नोट फाटकी तर इतर सर्व नोटांवर पेनाने लिहिलेले होते. या प्रतिनिधीकडून पेट्रोल पंपावरही या नोटा स्वीकारण्यात आल्या नाही तसेच स्टेशनरी शॉप आणि सर्व्हिसिंग सेंटरमध्येही नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. बँकेत तक्रार केली असता, बँकेनेही नोटा बदलून देण्यास नकार दिला. यानंतर बँकेच्या सूचनेनुसार कामासाठी काढलेले पैसे परत खात्यामध्ये जमा करावे लागले. यातील काही काम कार्ड वापरून करावे लागले आणि जेथे कार्ड वापरणे शक्य नव्हते तेथे मित्राकडून उधारी घेऊन काम करावे लागले. या प्रतिनिधीला आलेला अनुभव अनेक लोकांना येत असून, सामान्य ग्राहकांना अशाप्रकारे मनस्ताप सहन करावा लागत असेल तर यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममधून अशाप्रकारे फाटक्या आणि सदोष नोटा मिळत असल्याच्या नक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाला आता जवळपास वर्षभर जास्त काळ झाला आहे. २०००, ५०० तसेच २०० आणि ५० च्या नवीन नोटा आल्या आहेत. या नोटांवर काही लिहू नये, रंग लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. वास्तविक ग्राहकांना एटीएममधून मिळालेल्या नोटांची जबाबदारी संबंधित बँकेने स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर एटीएममधूनच या नोटा काढण्यात आल्या याचा पुरावा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून विचारला जातो. एटीएममधून निघणारी स्लीप ग्राह्य मानली जात नाही.
सदोष नोटा येण्याचा प्रश्नच नाहीबँकेमध्ये करन्सी चेसींग करून सदोष नोटा वेगळ्या काढल्या जातात आणि चांगल्या नोटांचे बॉक्स एजन्सीकडे सोपविले जातात. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचेही काम कॅमेराच्या देखरेखीतच चालते आणि मध्ये या नोटा बदलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सदोष नोटा येण्याचा प्रश्नच नाही, असा दावा बँक आॅफ इंडियाचे रिजनल मॅनेजर विजय सिंह यांनी केला. त्यांनी सांगितले की, निवडलेल्या सदोष नोटा पुन्हा करन्सी चेसींग करून रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्या जातात. अनेक ग्राहक सदोष नोटा बदलविण्यासाठी येतात. मात्र नोटा बदलवून देणे आम्हाला शक्य नाही. मात्र आणलेल्या सदोष नोटा आम्ही ग्राहकांच्या खात्यात जमा करतो, असेही त्यांनी सांगितले. ग्राहकांनी सदोष नोटा आल्यास एटीएमच्या कॅमेरासमोर या नोटा दाखूवन बाहेर पडावे, त्यामुळे त्यांची तक्रार रेकार्ड होईल, असा सल्ला त्यांनी दिला.
मग नोटा कोण बदलवितो?बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोटा एटीएमपर्यंत पोहचविण्याचे काम एजन्सीमार्फत केले जाते. बँकेच्या करन्सी चेसींग विभागात पूर्ण तपासणी करण्यात येते व सदोष नोटा वेगळ्या काढून चांगल्या नोटा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना सोपविल्या जातात. एजन्सीचे कर्मचारीही संपूर्ण कॅमेराच्या देखरेखीत या नोटा एटीएममध्ये टाकतात. त्यामुळे एटीएमपर्यंत १०० टक्के चांगले नोट जात असतील याची खात्री बाळगायला हरकत नाही. मग एटीएममधून निघणाऱ्या या नोटांवर रंग कोण लावतो आणि लिखाण कसे होते हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या एजन्सी किंवा लोकांवर या नोटा एटीएमपर्यंत पोहचविण्याचे काम आहे त्यांच्याकडून तर हा प्रकार होत नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.