लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात एकच विकास प्राधिकरण असावे, या हेतूने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नागपूर सुधार प्रन्यास रद्द करून शहरातील नासुप्रच्या मालमत्ता व योजना मनपाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मागच्या भाजप सरकारने व त्यावेळी नागपूरचे मुख्यमंत्री असल्याने विधानसभेत नासुप्र बरखास्तीची घोषणा केली होती. मात्र भाजप सरकारच्या काळात नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यानंतर राज्यातील सत्ता परिवर्तनासोबतच नासुप्रला पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्य सरकारने आ. विकास ठाकरे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी नियुक्ती करून नासुप्र पुनरुज्जीवित होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
युती सरकारच्या निर्णयानंतर नासुप्रकडील गुंठेवारी व उद्यान हे दोन विभाग मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले. नासुप्रच्या मालकीच्या शहरातील मालमत्ता व लीजवरील भूखंड अजूनही त्यांच्याकडे कायम आहे. बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अजूनही नासुप्रचा कारभार सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नासुप्रच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
नासुप्रच्या विकास योजना एनएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मात्र एनएमआरडीएत नासुप्रतील अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. राज्यात सत्ता असलेल्या पक्षाच्या आमदाराची नासुप्रवर विश्वस्त म्हणून नियुक्ती केली जाते. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात माजी आमदार दीनानाथ पडोळे यांची तर शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात माजी आमदार सुधाकर कोहळे यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता महाविकास आघाडी सरकारने विकास ठाकरे यांची विश्वस्तपदी नियुक्ती केली आहे.
गुंठेवारी विभाग नासुप्रकडे जाणार?
भूखंडधारकांना सुविधा व्हावी, यासाठी गुंठेवारी विभाग नासुप्रकडून मनपाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र नगर रचना विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने भूखंड नियमितीकरणाच्या कामाला दीड वर्षानंतरही गती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत गुंठेवारी विभाग पुन्हा नासुप्रकडे हस्तांतरित करून नासुप्रला पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याची नासुप्रत चर्चा आहे.