- निशांत वानखेडे नागपूर -उत्तर नागपूरच्या ठवरे काॅलनी येथे उद्यानाच्या साैंदर्यीकरणासह वाचनालय व याेग केंद्राचे थाटात उद्घाटन केल्यानंतर पुन्हा कुलुपबंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये राेष आहे. विशेष म्हणजे बांधकामानंतर हे वाचनालय व उद्यान दाेन वर्ष धुळखात बंद हाेते आणि आता पुन्हा कुलुपबंद करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार दलित वस्ती सुधार कार्यक्रमाअंतर्गत आमदार निधीतून नागपूर सुधार प्रन्यासद्वारे ठवरे काॅलनीत असलेल्या उद्यानाचे नुतणीकरणासह त्या ठिकाणी वाचनालय व याेग केंद्र बांधण्यात आले. यासाठी एक काेटी २४ लक्ष रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बांधकामानंतर दाेन वर्ष उद्यान व वाचनालय बंद राहिले व स्थानिक लाेक लाभ घेण्यासाठी प्रतीक्षा करीत राहिले. त्यानंतर स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत पाठपुरावा केला. त्यामुळे नुकतेच ३ मार्च राेजी आमदार नितीन राऊत यांच्याहस्ते उद्यान व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचा कार्यक्रम रंगला आणि दुसऱ्याच दिवशी सोसायटीतील पदाधिकाऱ्यशांनी कुलूप लावण्यात आले. कुलुप लावण्याचे कारण कुणीही सांगितले नाही. त्यामुळे उद्घाटनानंतर आनंदित झालेल्या नागरिकांची पुन्हा निराशा झाली.
ही जागा नझुलची आहे. जुन्या उद्यानात नागरिकांना फिरायला मिळत हाेते. शिवाय तरुणांच्या प्रयत्नाने येथे छाेटे वाचनालयही सुरू करण्यात आले हाेते. मात्र तेव्हाही ९-१० वर्ष वाचनालय बंदच राहिले हाेते. पुढे सुरू करण्यात आले व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळाली हाेती. नुतणीकरणाच्या कामामुळे चांगल्या सुविधांची अपेक्षा हाेती पण पुन्हा भ्रमनिराश झाला. साेसायटीचे पदाधिकारी मालकीची जागा असल्यासारखे मनमर्जीने कारभार करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांनी आमदार राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला पण तिकडून अद्याप प्रतिसाद आला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सव्वा काेटी खर्च करून उद्यान व वाचनालय तयार केल्यानंतर नागरिकांना त्याचा उपयाेग हाेत नसेल तर फायदा काय? साेसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अरेरावी न करता सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्या.- राजीव खोब्रागडे, सदस्य, द प्लॅटफॉर्म