- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - नागपूरमेट्रो रेल्वेचे अखेरचे ३८ वे इंदोरा स्टेशन ३० जूनपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली होती. पण ही डेडलाईन संपली असून आता ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) तपासणीनंतरच हे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार असल्याची माहिती आहे.
उत्तर नागपूरचे नागरिक संतप्त महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेंतर्गत पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागात इंदोरा मेट्रो स्टेशन वगळता ३८ पैकी ३७ स्टेशन सुरू झाले. या स्टेशनचे बांधकाम आणि सौंदर्यीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. विशेषत: या स्टेशनकरिता खासगी जागा मिळण्यास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे बांधकामाला उशीर झाला. त्यामुळे उत्तर नागपुरातील प्रवाशांना मेट्रो रेल्वेचा लाभ पूर्ण क्षमतेने मिळत नाही. हे स्टेशन लवकर सुरू करण्यासाठी या भागातील वरिष्ठ नागरिकांनी मेट्रो रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी इंदोरा स्टेशन ३० जूनपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
कडबी चौक व नारी मेट्रो स्टेशनवरून जातात प्रवासीमेट्रोने प्रवास करणाऱ्यांची उत्तर नागपुरातील नागरिकांची संख्या वाढली आहे. इंदोरा स्टेशन सुरू न झाल्याने त्यांना कडबी चौक आणि नारी मेट्रो स्टेशनवरून प्रवास करावा लागतो. याकरिता जास्त अंतर कापावे लागते. याशिवाय या दोन्ही स्टेशनवर पार्किंगकरिता पुरेशी जागा नाही. अनेकांना फूटपाथवर गाड्या पार्क करून मेट्रोने प्रवास करावा लागतो.
उत्तर नागपूरची शहराच्या कानाकोपऱ्यात कनेक्टिव्हिटी वाढेलउत्तर नागपूरचे मध्यवर्ती ठिकाण इंदोरा चौकात वाहतुकीची वर्दळ असते. बसेसची व्यवस्था आहे. हे स्टेशन सुरू झाल्यास उत्तर नागपुरातील व्यापारी क्षेत्राचा टप्पा वाढेल. शिवाय मेट्रोने सीताबर्डी आणि शहराच्या कानाकोपऱ्यात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, तसेच पुरूष व महिलांच्या संख्येत निश्चित वाढ होईल. इंदोरा मेट्रो स्टेशन सुरू करण्याची आमची मागणी अनेक वर्षांनंतर पूर्ण होत आहे. - अतुल खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते.
जागेचे अधिग्रहण आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे इंदोरा स्टेशनचे बांधकाम आणि स्टेशन सुरू होण्यास विलंब झाला. पण आता काम अखेरच्या टप्प्यात आहे. ऑगस्ट महिन्यात मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची चमू स्टेशनची तपासणी करण्याची शक्यता आहे. आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर स्टेशन प्रवाशांसाठी खुले होईल.- अखिलेश हळवे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी (कॉर्पोरेट).