लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ब्रेनस्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेनडेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात पतीच्या बहिणीने व त्यांच्या कुटुंबीयानीही साथ दिली. यामुळे तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.बाबुराव तुंगापिंडी (४२) रा. आयुध फॅक्टरी, चांदा, भद्रावती, चंद्रपूर असे अवयवदात्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, बाबुराव तुंगापिंडी यांना ५ फेब्रुवारी रोजी तीव्र ‘ब्रेनस्ट्रोक’ आला. त्यांना तातडीने एका खासगी इस्पितळात दाखल केले. तो पर्यंत ते कोमात गेले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. ७ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मेंदू मृत (ब्रेनडेड) झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. तुंगापिंडी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हॉस्पिटलचे डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांनी अवयवदानाचा सल्ला दिला. त्यांच्या पत्नी शबाना तुंगापिंडी, त्यांची बहीण विज्रा सलीम सय्यद व कुटुंबातील सदस्य संजय आनंद यांनी त्या दु:खातही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, उपाध्यक्ष व्ही. एल. गुप्ता व सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात ‘झेडटीसीसी’च्या समन्वयिका वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दोन्ही मूत्रपिंड, यकृत व दोन्ही बुबुळाचे दान करण्यात आले.वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय महिलेवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. सुजीत हाजरा, डॉ. अवंतिका जयस्वाल यांनी केली. त्यांना हॉस्पिटलचे प्रमुख के. सुजाता यांचे मार्गदर्शन मिळाले. दुसरे मूत्रपिंड ५६ वर्षीय महिलेला, तर यकृत ६३ वर्षीय पुरुषाला देण्यात आले. दोन्ही बुबुळ माधव नेत्रपेढीला दान करण्यात आले.
नागपुरात पत्नीच्या पुढाकारामुळे पतीचे अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:20 PM
‘ब्रेनस्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेनडेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देदोन्ही मूत्रपिंड, यकृत व बुबुळाचे दान : तिघांना मिळाले जीवनदान तर दोघांना दृष्टी