लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या २२ वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या शासकीय विज्ञान संस्थेला अखेर स्वायत्तता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयाेगाने (यूजीसी) संस्थेचा प्रस्ताव मान्य केला असून त्यांची टीम डिसेंबर महिन्यात निरीक्षणासाठी येणार असल्याची माहिती समाेर आली आहे.
यूजीसीच्या टीममध्ये राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ व राज्य शासनाकडून एकेक प्रतिनिधी नियुक्त करावा लागताे. सूत्राच्या माहितीनुसार, विद्यापीठाने त्यांच्या प्रतिनिधीचे नाव पाठविले आहे, मात्र शासनाचा प्रतिनिधी निश्चित न झाल्याने निरीक्षण दाैऱ्याची तारीख निश्चित हाेऊ शकली नाही. संस्थेकडून आठवडाभरापासून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. सत्रानुसार टीमच्या दाैऱ्याच्या तयारीत लागलेल्या अधिकाऱ्यांना शासनाच्या प्रतिनिधीचे नाव ८ डिसेंबरपर्यंत निश्चित हाेण्याची शाश्वती आहे आणि यूजीसीला ते नाव पाठविण्यात येईल.
स्वायत्तता मिळविण्यासाठी संस्थेकडून गेल्या २२ वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र विद्यापीठात हा प्रस्ताव प्रलंबित आहे. दरम्यान, २००८ मध्ये विद्यापीठाकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली हाेती परंतु पुढे काही कारवाई झाली नाही. २०१६ मध्ये पुन्हा प्रयत्न केले गेले पण अपयश आले. मागील वर्षी नॅककडून ए दर्जा मिळाल्यानंतर संस्थेने पुन्हा प्रयत्न चालविले.
मनुष्यबळाची कमतरता ठरेल अडथळा
यावेळी यूजीसीकडून संस्थेला स्वायत्तता प्राप्त हाेईल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. मात्र मानव संसाधनांची कमतरता अडथळा ठरू शकते. संस्थेत शिक्षकांची ७४ पदे आहेत पण ५३ भरलेले आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही २० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या मते मनुष्यबळाची कमतरता समस्या निर्माण करणार नाही. याबाबत उच्च शिक्षण विभागाशी चर्चा केली जात आहे.