नागपूर : नागपूर जिल्हा परिषद ही काँग्रेस नेत्यांच्या हातात असून, गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने भ्रष्टाचार घडत आहे, गेल्या काही महिन्यांपूर्वी महिला व बालविकास विभागाने शासनाने आखून दिलेल्या नियमाची पायमल्ली करून निधी वाटप केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शनिवारी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून भ्रष्टाचार संपणार नाही. याची सखोल चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावरकारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात सुधाकर कोहळे यांच्यासह आमदार टेकचंद सावरकर, डॉ. राजीव पोतदार,अरविंद गजभिये, सुधीर पारवे, चरणसिंग ठाकुर, अजय बोढारे, अनिल निदान, आतिश उमरे, मनोहर कुंभारे, समीर उमप, गज्जूभैया यादव यांच्यासह जि.प. सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सकारात्मक आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती कोहळे यांनी दिली.