नागपूर : अलीकडे ऑनलाईन काम वाढले आहे. कोरोनानंतर यात आणखीनच भर पडली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच नवीन संधीच्या शोधासाठी उच्च कौशल्ये आत्मसात करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या अभ्यासक्रमासाठी नागपूरसह एर्नाकुलम, म्हैसूर, जयपूर आणि इंदूर या शहरांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
एडटेक प्लॅटफॉर्म ग्रेट लर्निंग यांनी केलेल्या एका अहवालानुसार ही बाब पुढे आली आहे.
आयटी, बँकिंग, शिक्षण आणि प्रशिक्षण, आरोग्यसेवा आणि सल्ला हे या वर्षी उच्च कौशल्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांमधील शीर्ष पाच उद्योग आहेत.
सर्वेक्षण केलेल्यांपैकी जवळपास ७९ टक्के व्यावसायिक २०२२ मध्ये २०२१ च्या पातळीला मागे टाकून कौशल्य वाढवू पाहत आहेत.
‘डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे सर्वाधिक पसंतीचे डोमेन आहेत आणि ६२ टक्के लोकांना असे वाटते की ऑफिसमध्ये परत गेल्याने त्यांच्या उच्च कौशल्याच्या योजनेवर परिणाम होणार नाही,’ असे निष्कर्ष दर्शवितात.
२०२१ मध्ये नवीन डोमेनमधील नोकऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे, ७० टक्क्यांहून अधिक लोकांनी नवीन संधी मिळवण्यासाठी उच्च कौशल्य प्राप्त करणे निवडले. २०२२ मध्ये वेब ३.०, मेटाव्हर्स, एनएफटी इत्यादीसारख्या नवीन डोमेनच्या उदयासह उच्च कौशल्याच्या दिशेने आणखी ठोसपणे पाऊल पडल्याचे दिसून येते. ७९ टक्के लोक अजूनही २०२२ मध्ये कुंपणावर असून आणखी ११ टक्के लोकांसह उच्च कौशल्याची योजना आखत असल्याचेही या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
- प्रमुख महानगरांच्या वर्चस्वाला छेद
या अहवालात २०२१ आणि २०२२ मध्ये मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद यासारख्या प्रमुख महानगरांमधील व्यावसायिकांनी त्यांचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने उच्च कौशल्ये वाढवण्याचा हेतू दर्शविला आहे. उच्च शिक्षण असो की कौशल्य प्रत्येक बाबतीत मुंबई-दिल्लीसारखे प्रमुख महानगरे ही आघाडीवरच असतात. परंतु कौशल्य प्राप्त करून घेण्याच्या बाबतीत आता नागपूरसह दुसऱ्या स्तरावरील महानगरे उच्च कौशल्य अभ्यासक्रमांसाठी हॉटस्पॉट ठरत असून या शहरांनी प्रमुख महानगरांच्या वर्चस्वाला एकप्रकारे छेद दिला आहे.
---------------------