नागपूर : सध्या नागपुरात मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. मुख्य मार्गावरील भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटली जात आहेत. चौकाचौकांचा मेकओव्हर सुरू आहे. जी-२० परिषदेसाठी हे सौंदर्यीकरण होत असल्याने ही परिषद नेमकी आहे तरी काय? याचीच सर्वत्र चर्चा आहे.
जागतिक स्तरावरील जी-२० (ग्रुप ऑफ २०) शिखर परिषद आयोजित करण्याचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. जी-२० अंतर्गत नागरी समाज संस्थांचा अर्थात ‘सिव्हिल सोसायटी’ (सी-२०) या गटाची प्रारंभिक परिषद नागपूर येथे २१ व २२ मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे. सी-२० परिषदेच्या माध्यमातून स्थानिक नागरी संस्थांना आपले कार्य-कर्तृत्व जगाच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देवाण-घेवाणीचे केंद्र म्हणून नागपूर शहराला सादर करण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. देश- विदेशातील पाहुण्यांच्या आदरातिथ्याची संधीही भारताचे हृदयस्थान असलेल्या नागपूर शहराला मिळाली आहे. नागपूर शहरात होणाऱ्या या जागतिक परिषदेबाबत जनसामान्यांमध्ये विशेष कुतूहल आहे.
- जी-२० काय आहे ?
जी-२० किंवा ग्रुप ऑफ २० हा १९ देश आणि युरोपियन युनियन या देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे. जी-२० गटाचे कुठेही मुख्यालय अथवा सचिवालय नाही. जी-२० ची शिखर परिषद ही चक्राकार पद्धतीने निवड झालेल्या सदस्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी त्या-त्या देशात आयोजित केली जाते. जी-२० हा गट व्यापार, गुंतवणूक, कर आणि आर्थिक धोरणांसह जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या विविध मुद्यांवर लक्ष केंद्रित करतो. यातून सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यात येते. जी-२० ने सुरुवातीला व्यापक आर्थिक मुद्यांवर लक्ष केंद्रित केले; परंतु कालांतराने या गटाने व्यापार, हवामान बदल, शाश्वत विकास, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण आणि भ्रष्टाचारविरोध या मुद्यांचा समावेश करून कार्यविस्तार केला आहे.
- यंदाच्या जी-२० परिषदेचे घोषवाक्य
१ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारत जी-२० संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताच्या यजमानपदात आयोजित या परिषदेचे घोषवाक्य ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अर्थात ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे आहे. पृथ्वीतलावरील मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यासह संपूर्ण जीवसृष्टीचे महत्त्व आणि त्यांच्यातील परस्परसंबंधाचे महत्त्व या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आले आहे.
- जी-२० चे सदस्य देश
जी-२० समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया गणराज्य, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि युरोपियन संघ यांचा समावेश आहे.