प्रवीण खापरे
नागपूर : ‘देशाच्या राजपाटाचे केंद्र नागपूर आहे’ ही सध्याची प्रसिद्ध अशी राजकीय कोटी असली तरी त्यात तथ्य नाही, असे मानण्याचे कारण नाही. कारण, ६४ घरांचा खेळ असलेल्या बुद्धिबळाच्या (चेस) पटावर नागपूर सध्या जगाचे नेतृत्त्व घडवत असल्याचे दिसून येत आहे. देशात चेन्नई हे बुद्धिबळपटू घडविण्याचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यापाठोपाठ आता नागपूर मार्गक्रमण करत असून, नागपुरातून मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू तयार होत असल्याचे दिसून येते.
नागपुरातील वरिष्ठ बुद्धिबळपटू देश-विदेशातील बुद्धिबळपटूंना आभासी (ऑनलाइन) व प्रत्यक्ष (फिजिकल) प्रशिक्षण देत आहेत. त्यात अनेक ग्रॅण्डमास्टर व इंटरनॅशनल मास्टर्सचा समावेश आहे. येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेल्या खेळाडूंची खेळण्याची विशिष्ट शैली त्यांना या खेळात श्रेष्ठ ठरवत असल्याने जगातील आघाडीचे बुद्धिबळपटू नागपूरच्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेण्याला प्राधान्य देत असल्याचे वर्तमानातील चित्र आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात बुद्धिबळामध्ये विद्यार्थ्यांनी यावे, या अनुषंगाने नागपुरात चेस असोसिएशनच्या माध्यमातून विशेष नियोजन करण्यात येत असल्यानेही बाल्यावस्थेपासूनच नागपुरातील मुले बुद्धिबळामध्ये जग गाजवत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूरचे ग्रॅण्डमास्टर्स
- १९९९मध्ये चेस ऑलिम्पियाडमध्ये खेळलेले दोन छत्रपती (खेळणे व कोचिंगसाठी) पुरस्कार प्राप्त व राष्ट्रपती अवॉर्ड प्राप्त अनुप देशमुख हे नागपुरातील पहिले इंटरनॅशनल मास्टर्स आहेत. त्यापाठोपाठ अमरावती येथील स्वप्नील धोपाडे हा विदर्भातील पहिला ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. अंकाच्या दृष्टीने ग्रॅण्डमास्टर्स हा सर्वात मोठा बहुमान ठरतो. नागपूरचा रौनक साधवानी हा नागपूरचा पहिला व सर्वात युवा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. दिव्या देशमुख, संकल्प गुप्ता हे खेळाडूही ग्रॅण्डमास्टर आहेत. इंडोनेशियातील जकार्तामध्ये पार पडलेल्या पॅराऑलिम्पियाडमध्ये नागपूरच्या नेत्रबाधित मृणाली पांडे व तिजन पवार या बुद्धिबळपटूंनी कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानित केले होते.
प्रशिक्षकांचा हब
- बुद्धिबळपटूंना घडविण्याचे कार्य अनेक ज्येष्ठ बुद्धिबळपटूंनी सातत्याने केले आहे. त्यात स्व. राहुल जोशी व देशातील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये असलेले स्व. अब्दुल जब्बार यांनी केले आहे. सध्या गुरूप्रित सिंह मरास, अनुप देशमुख, भूषण श्रीवास, सुशांत जुमडे, फिडे मास्टर्स आकाश ठाकूर, सच्चिदानंद सोमण, शैलेश द्रविड, सौरभ खेर्डेकर आदी वरिष्ठ खेळाडू नागपूरसह देश-विदेशातील बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन करत आहेत.
- नागपूरचे खेळाडू आणि बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनासाठी देशातील पहिल्या सात शहरांमध्ये येते. कॉमनवेल्थसारखे आयोजन येथे होते. प्रत्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे आणि त्यादृष्टीने त्यांची तयारी केली जात आहे.
- अनुप देशमुख, वरिष्ठ बुद्धिबळपटू व प्रशिक्षक
- नागपूर हे चेन्नईनंतर बुद्धिबळपटूंचे मोठे हब म्हणून उदयास आले आहे. नागपुरातून घडलेल्या खेळाडूंची शैली देश-विदेशातील खेळाडूंना भावत असल्याने अनेक परदेशी खेळाडू ऑनलाइन किंवा नागपुरात येऊन प्रशिक्षण घेत आहेत.
- सुशांत जुमडे, बुद्धिबळ प्रशिक्षक