सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात गतीने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, नागपूरला ३००ची रुग्ण संख्या गाठायला ६३ दिवसांचा कालावधी लागला, तर अकोल्यात केवळ ४३ दिवसात ही संख्या गाठली. गुरुवारी नागपुरात आठ तर अकोल्यात १६ रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय, येथे एक दिवसाआड रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोविड रुग्णसंख्येत अकोला नागपूरला मागे तर टाकणार नाही ना, अशी चिंता उपस्थित केली जात आहे. शासनाने या जिल्ह्यात व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्याच्या १४ तारखेपर्यंत रुग्णांची संख्या वाढून ५० झाली. २४ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या १०० झाली. २ मे रोजी रुग्णांची संख्या १५० वर पोहचली. ७ मे रोजी २६७ तर १२ मे रोजी नागपूरने ३०० रुग्णांची संख्या ओलांडली. ही संख्या गाठायला ६३ दिवस लागले.अकोल्यात पहिल्या रुग्णाची नोंद ७ एप्रिललाअकोल्यात पहिल्या रुग्णाची नोंद ७ एप्रिल रोजी झाली. सुरुवातीला रुग्ण वाढण्याची गती फारच संथ होती. या महिन्यात ५० च्या आत रुग्ण होते. परंतु मे महिन्याला सुरुवात होताच झपाट्याने रुग्ण वाढायला लागले. ८ मे रोजी जिल्ह्यात रुग्णांची संखा १३७ होती. १० मे रोजी १५४ वर रुग्णसंख्या गेली. चार दिवसांत ५० रुग्णांची भर पडून १४ मे रोजी २०७ वर पोहचली. १७ मे रोजी २५७ तर २० मे रोजी रुग्णांची संख्या ३०८ झाली. रुग्णांचा हा टप्पा गाठायला ४३ दिवस लागले.नागपुरात सात तर अकोल्यात २१ मृत्यूनागपूरच्या तुलनेत अकोल्यात तीन पटीने मृत्यू झाले आहेत. नागपुरात पहिला मृत्यू ४ एप्रिल, दुसरा २१ एप्रिल, तिसरा २८ एप्रिल, चौथा ६ मे, पाचवा १६ मे, सहावा १७ मे तर सातवा १८ मे रोजी मृत्यूची नोंद झाली तर अकोल्यात पहिला मृत्यू १ मे रोजी होता. नंतर २ मे एक, ३ मे दोन, ६ मे चार, ८ मे एक, १० मे एक, ११ मे एक, १३ मे एक, १५ मे दोन, १७ मे एक, १९ मे दोन तर आज २० मे रोजी पुन्हा एक असे एकूण २० मृत्यू व एका रुग्णाची आत्महत्या अशी २१ मृतांची नोंद आहे. विशेष म्हणजे, नागपुरात गंभीर स्वरूपात रुग्णालयात येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या पाच आहे. एका रुग्णाचा मृत्यू उपचाराच्या सात दिवसानंतर झाला. तर एका रुग्णाचा घरीच मृत्यू झाल्यानंतर त्याचे नमुने पॉझिटिव्ह आले. तर अकोल्यात ९ रुग्णांचे मृत्यू आयसोलेशन वॉर्डात उपचार घेताना झाले आहेत.नागपुरात ७८ टक्के तर अकोल्यात ५८ टक्के कोरोनामुक्तनागपुरात गुरुवार दुपारपर्यंत ३९५ रुग्ण व ३१० कोरोनामुक्त तर अकोल्यात ३२४ रुग्ण व १९१ कोरोनामुक्तांची नोंद होती. टक्केवारीनुसार नागपुरात ७८.४८ टक्के तर अकोल्यात ५८.९५ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले.