खापरखेडा (नागपूर) : इटगाव (ता. पारशिवनी) शिवारातील खून प्रकरणात मृताची ओळख पटविण्यासाेबतच त्याच्या तीन मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याचा मृतदेह मंगळवारी (दि. २) सकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला हाेता. लाेखंड चाेरीची माहिती पाेलिसांना देईल किंवा ब्लॅकमेल करेल, या भीतीपाेटी ट्रकमालकाने त्याच्या दाेन साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
नीतेश मुरलीधर सेलोकर (वय २५, रा. पारडी, नागपूर) असे मृताचे नाव असून, संजय ऊर्फ गिरीधारीलाल सुखराम पारधी (वय ३५, रा. पारडी, नागपूर), चंद्रशेखर ऊर्फ गोलू जगन्नाथ साहू (२६, पारडी, नागपूर) व अक्षय ऊर्फ कमांडो भगवान मसराम (२६, रा. मिनी मातानगर, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. नीतेश हा संजयच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता.
नीतेश संजयच्या एमएच-४०/एके-९११९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २५ टन लाेखंड घेऊन येत असताना संजय, अक्षय व गाेलूने ट्रकमधील संपूर्ण लाेखंड काेहमारा (जिल्हा गाेंदिया) येथे नातेवाइकाकडे उतरविले. त्यानंतर त्यांनी त्या लाेखंडाची विल्हेवाट लावली व नीतेश रिकामा ट्रक घेऊन नागपूरला परत आला. साेमवारी (दि. २) रात्री अक्षयने नीतेशला ट्रक चालविण्यासाठी साेबत नेले. दुसऱ्या कारमध्ये संजय, गाेलू व अन्य दाेघे हाेते. सर्वजण ट्रक व कारने कामठी, कन्हान, आमडी, पारशिवनी, खापा, बडेगावमार्गे रायवाडी रेतीघाट परिसरात गेले. रायवाडी शिवारात नीतेश व अक्षयने डिझेल ओतून ट्रक पेटवून दिला.
लाेखंडी चाेरीतून मिळालेले पैसे संपल्यानंतर नीतेश या प्रकाराची माहिती पाेलिसांना देऊ शकताे किंवा आपल्याला ब्लॅकमेल करू शकताे, अशी तिघांना शंका आली. त्यामुळे त्यांनी नीतेशला कारने बडेगाव, खापा, पाटणसावंगी, दहेगाव (रंगारी), खापरखेडामार्गे इटगाव शिवारात नेले. तिथे तिघांनी त्याचा खून केला. त्याचा मृतदेह तुराट्यांच्या ढिगावर ठेवून त्यावर चार लिटर पेट्राेल ओतले. ताे ढीग पेटवून तिघांनीही खापरखेडा, कामठीमार्गे नागपूर गाठले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली दिली. त्या तिघांनाही नागपूर शहरातून ताब्यात घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..अशी पटली मृताची ओळख
इटगाव शिवारात अनाेळखी मृतदेह आढळल्याने तसेच त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहरातील बेपत्ता लाेकांची यादी तपासून बघितली. त्यात नितेश रविवारपासून (दि. १) बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. ताे संजय पारधी याच्या ट्रकवर चालक म्हणून बिलासपूरला येथे गेल्याचे त्याचे वडील मुरलीधर व भाऊ मंगेश यांनी पाेलिसांना सांगितले. संजयनेही ताे बिलासपूरहून परत न आल्याचे सांगितले. त्यानंतर मुरलीधर व मंगेशने त्याचा मृतदेह ओळखला.
ट्रक जाळून इन्शुरन्स क्लेमची याेजना
नितेश ११ एप्रिल राेजी राेजंदारीवर संजय पारधी याच्या ट्रकवर (क्र. एमएच-४० एके-९११९) चालक म्हणून बिलासपूर (छत्तीसगड)ला ऑइलचे बाॅक्स घेऊन गेला हाेता. त्यानंतर ताे त्याच ट्रकमध्ये रायपूर (छत्तीसगड) येथून २५ टन लाेखंडी ॲंगल घेऊन पिपरिया (मध्य प्रदेश) येथे जायला निघाला. देवरी (जि. गोंदिया) परिसरातील घाटात ट्रकचे टायर खराब झाल्याने संजय, अक्षय व गाेलू पिंटू सेलोकरची कार घेऊन देवरीला गेले. ट्रक दुरुस्तीनंतर त्या तिघांनी ट्रकमधील लाेखंड चाेरून विकण्याची आणि ट्रक जाळून इन्शुरन्स क्लेम करण्याची याेजना आखली.
दाेघांच्या पायावर भाजल्याचे निशाण
नितेशचा मृतदेह जाळण्यासाठी त्या तिघांनी पारडी परिसरातील पेट्राेल पंपहून आधीच चार लिटर पेट्राेल खरेदी केले हाेते. नितेशचा मृतदेह ठेवलेल्या तुराट्याच्या ढिगाला लाग लावताना संजयचा एक तर अक्षयचे दाेन्ही पाय भाजले हाेते. हा पुरावादेखील पाेलिसांच्या हाती लागला आहे.