लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार भागात पवनी (ता. रामटेक) बफर झोनमधून गेलेल्या नागपूर - जबलपूर महामार्गावरील पवनी - चोरबाहुली दरम्यान मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या बफर झोनमधील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सदर बिबट हा अंदाजे चार ते पाच वर्षांचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. तो पहाटेच्या सुमारास पवनी - चोरबाहुली दरम्यानचा नागपूर - जबलपूर महामार्ग ओलांडत होता. बफर झोनचा हा परिसर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कम्पार्टमेंट क्रमांक - ५९० मध्ये येतो. दरम्यान, नागपूरहून जबलपूरकडे भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. सदर वाहन ट्रक असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यात बिबट्याची आतडी बाहेर आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान, वन विभागाचे (वन्यजीव) डॉ. बी. कडू, डॉ. चेतन पाथोडे, पशुशल्यचिकित्सक डॉ. डी. मानकर यांनी बिबट्याची उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण केली. वाहनाच्या जबर धडकेने त्याच्या पोटातील अवयवांना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी उपसंचालक नीनू सोमराज, सहायक वनसंरक्षक गीता नन्नावरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पांडुरंग पाखले, संकपाळ, ज्ञानेश्वर ढोके, लांजेवार यांच्या उपस्थितीत बिबट्यावर देवलापार परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागपूर - जबलपूर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:36 PM
भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार भागात पवनी (ता. रामटेक) बफर झोनमधून गेलेल्या नागपूर - जबलपूर महामार्गावरील पवनी - चोरबाहुली दरम्यान मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या बफर झोनमधील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देपवनी बफर झोनमधील घटना : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह