लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यसनाधिनतेमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या एका आरोपीकडून जरीपटका पोलिसांनी पिस्तुल तसेच आठ काडतूस जप्त केले. मनिंदरसिंग हरजिंदरसिंग चंडोक (वय ४४) असे आरोपीचे नाव असून तो कामठी मार्गावर राहतो.पाच ते सात वर्षांपूर्वी चंडोक सधन होता. त्याचे पाचपावलीत गारमेंट शोरूम होते. मात्र, चुकीच्या व्यक्तींसोबत संगत केल्याने त्याला वेगवेगळे व्यसन जडले. त्यानंतर तो व्यसनपूर्तीसाठी रोज हजारो रुपये उडवू लागला. परिणामी त्याचा व्यवसाय बुडाला. इकडून तिकडून कर्ज काढून त्याने सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्जाची रक्कम आणि दामदुप्पट व्याज भरू न शकल्याने त्याच्या जवळच्या कारसह होते नव्हते ते सर्वच हिरावले गेले. खाण्याचे वांदे असल्याने पत्नी आणि मुलगीही सोडून गेली. परिणामी चंडोक व्यसनात जास्तच बुडाला. त्याचे वडीलही आजारी पडले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर काही जणांनी हल्ला चढवला होता. तेव्हापासून तो गुन्हेगारीकडे वळला. त्याच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काडतूस असल्याची माहिती कळाल्याने परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप लांगड़े, उपनिरीक्षक संजय चप्पे, नायक रोशन तिवारी, प्रकाश बाळबुधे, लक्ष्मण चावरे आणि पवन यादव यांनी शुक्रवारी चंडोकच्या घरी धडक दिली. तपासणीत चंडोककडे एक पिस्तुल आणि आठ काडतूस आढळले. पोलिसांनी ते जप्त केले.
भुल्लरने दिले पिस्तुल ?हे पिस्तुल आणि काडतूस कुठून आणले, अशी विचारणा केली असता आरोपी चंडोक पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत आहे. मोंटी भूल्लरने हे पिस्तुल आणि काडतूस दिले होते, असे तो सांगतो. मोंटीची सात वर्षांपूर्वी हिंगण्यातील ग्रेट मराठा हॉटेलमध्ये हत्या झाली होती. त्यामुळे तो माहिती देण्यासाठी लपवाछपवी करीत असल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे.