कामठी : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरण व सिमेंटीकरणाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. हा मार्ग कामठी शहरातील मिलिटरी कॅन्टाेनमेंट परिसरातून जात असल्याने येथील कामावर संरक्षण विभागाने आक्षेप घेतला. त्यामुळे ते बंद करण्यात आल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे.
या महामार्गावरील नागपूर शहरातील ऑटाेमाेटिव्ह चाैक ते टेकाडी (कन्हान), ता. पारशिवनी दरम्यानच्या मार्गाच्या कामासाठी २३८ काेटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे कंत्राट केसी नामक कंपनीला दिले आहे. कंपनीने या कामाला २०१७ पासून सुरुवात केली. या कामाचा वेग सुरुवातीपासूनच संथ आहे. या कामासाठी करण्यात आलेल्या खाेदकामामुळे अपघातही वाढत गेले. या मार्गावर तीन वर्षात झालेल्या अपघातांमध्ये ५८ जणांना प्राण गमवावे लागले. याला कंत्राटदार कंपनीचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
या मार्गाचे कामठी शहरातील उप्पलवाडी, कल्पतरू काॅलनी, गरुड चाैक, साईमंदिर, आडापूल भागात बांधकाम रखडले आहे. शहरातील गरुड चाैक, कल्पतरू काॅलनी हा भाग कॅन्टाेनमेंट परिसरात येत असल्याने संरक्षण विभागाने या कामावर आक्षेप घेतला. त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केल्याने सर्व वाहतूक राेडच्या एका बाजूने सुरू आहे. परिणामी, वाहतुकीची काेंडी हाेत असल्याने अपघात हाेण्याची शक्यताही बळावली आहे. दुसरीकडे, शासनाने यावर ताेडगा काढून कामाला सुरुवात करावी आणि कंत्राटदाराने ते काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.