लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून सुराबर्डी (वाडी) येथील नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ)च्या अखत्यारित असलेली अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राची कोट्यवधींची जमीन एका प्रॉपर्टी डीलरला विकण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. या जमीन विक्री आणि फसवणूक प्रकरणात तलाठी, मंडल निरीक्षकासह अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या तत्कालीन प्राचार्य आणि सहायक पोलीस निरीक्षकानेही आरोपी म्हणून भूमिका वठविली आहे. सर्वत्र खळबळ उडवून देणारे हे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचे असून, आता ते उजेडात आले आहे.वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुराबर्डीला अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्राच्या अर्थात शासनाच्या मालकीची जमीन मौजा सुराबर्डी ५/ अ मधील गट क्रमांक ११० चे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर या जमिनीचा मालक म्हणून आरोपी कृष्णा बाबुरावजी खानोरकर याने प्रॉपर्टी डीलर ब्रिजकिशोर हरगोविंद अग्रवाल (सुराबर्डी इस्टेट प्रा. लि. चा संचालक) याला विकली. २१ फेब्रुवारी २००८ ते २६ जुलै २०१० या कालावधीत हा खरेदी विक्रीचा आणि अग्रवाल याच्या नावाने जमिनीची मालकी हक्क दाखवण्याची बनवाबनवी आरोपींनी केली. यात जमीन विकणारा कृष्णा बाबुरावजी खानोरकर, विकत घेणारा ब्रिजकिशोर हरगोविंद अग्रवाल या मुख्य आरोपींना खरेदीविक्रीचे दस्तावेज दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्यासाठी तसेच खोटे बंधपत्र, शपथ पत्र, प्रतिज्ञा पत्र तयार करण्यासाठी आरोपी प्रकाश काशीराम बोरकर (तत्कालीन तलाठी), दीपक हरिभाऊ मावळे ( तत्कालीन मंडल निरीक्षक) अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य शेषराव निवृत्ती भगत तसेच तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विलास दत्तूजी जगताप यांनीही मदत केली.प्राचार्य आणि निरीक्षकांचा प्रताप जावक वहीत खोडतोड, खोटी नोंदआज घडीला या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्यात अग्रवालकडून मोठा हिस्सा मिळवण्यासाठी आरोपी भगत आणि जगताप या दोघांनी जमिनीच्या मालकीची बनावट कागदपत्रे खरी वाटावी म्हणून चक्क प्रशिक्षण केंद्रातील जावक वहीत खोडतोड केली आणि २६ जुलै २०१० ला शासनाची जमीन आरोपी अग्रवालच्या नावे असल्याची नोंद केली. त्यानंतर पुढच्या व्यवहारासाठी ना हरकत प्रमाणपत्रही तयार केले.अखेर तक्रार अन् गुन्हा दाखलदहा वर्षांपूर्वीची ही बनवाबनवी वर्षभरापूर्वी लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. या फसवणूक प्रकरणात खासगी व्यक्तीसोबतच महसूल विभागाचे तसेच एएनओचेही अधिकारी असल्याने त्याची सूक्ष्म आणि प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी दीपक जयराम पाटील (वय ५४, रा. सुराबर्डी) यांनी वाडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचे कलम १९९, २००, ४६७, ४६८, ४७१, ४२०, ३४ अन्वये उपरोक्त सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाडीचे ठाणेदार नरेंद्र पवार या प्रकरणात पुढील चौकशी करीत आहेत.