लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी महाराजबागेजवळील पुलाच्या कठड्यावर दिसलेल्या बिबट्याचा शोध सायंकाळनंतर लागला नव्हता. परंतु आज (मंगळवारी) सकाळी महाराजबागेलगतच्या नाल्यांमध्ये त्याने डुकराची शिकार केल्याचे व अर्धवट खाल्ल्याचे आढळून आले.
शुक्रवारपासून शहरातील आयटी परिसरात तो संचार करत होता. दरम्यान सोमवारी दुपारी तो महाराज बागेजवळ आढळला. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी चार ठिकाणी पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडीही सोडण्यात आली होती. सायंकाळपर्यंत व रात्रीही त्याचा या परिसरात शोध घेण्यात आला होता, मात्र तो सापडला नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी वनविभागाचे पथक शोध घेत असताना महाराजबागेच्या सुरक्षा भिंत लगतच नाल्यामध्ये एक डुक्कर अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळले.
यावरून हा बिबट्या याच परिसरात असल्याचे आता खात्री झाली आहे. त्याला पकडण्यासाठी पुन्हा काही पिंजरे आज दुपारी लावले जात आहेत. नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे आणि कॅमेरा ट्रॅप सुद्धा लावण्याचे काम या परिसरात वन विभागाने सुरू केले आहे.बिबट्याचा माग काढण्यासाठी प्रशिक्षित श्वानाला पाचारण करण्यात आले होते. मात्र परिसरात नागरिकांची वर्दळ झाल्याने श्वानाला माग काढता आला नाही.