नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत असून राज्यातील ५ मतदारसंघात मतदान होत आहेत. त्यात विदर्भातील नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आईचा हात पकडून सपत्निक मतदान केंद्रावर पोहचले. त्याठिकाणी फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदान केंद्रात घेऊन जाताना दिसतायेत. मी माझ्या कुटुंबियांसोबत मतदान केले, आपणही मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हा असं आवाहन यावेळी फडणवीसांनी केले.
सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस सातत्याने चर्चेत आहेत. महायुतीच्या सभा, उमेदवारी अर्ज दाखल करणे, रॅली, नाराजी बंडखोरी दूर करणे, रणनीती आखणं यात देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस १२५ हून अधिक सभा घेणार असल्याचंही म्हटलं जातं. त्यात आज फडणवीसांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावल्याचं दिसून आले.
दरम्यान, नागपूर येथे दुपारी १ वाजेपर्यंत २८.७५ टक्के मतदान झालं आहे. त्यात मध्य नागपूर - २८.४२ टक्के, पूर्व नागपूर - ३१.३० टक्के, उत्तर नागपूर - १९.४८ टक्के, दक्षिण नागपूर - ३१.८९ टक्के, दक्षिण-पश्चिम नागपूर - ३२ टक्के, पश्चिम नागपूर - ३०.०५ टक्के इतके मतदान झालं आहे.