योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानवाढीसाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते. शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याला प्रतिसाद देत सकाळच्या सुमारासच मतदान केंद्र गाठले. अनेक ज्येष्ठांना स्वत:च्या पायाने दहा पावले चालणेदेखील शक्य होत नव्हते. मात्र तरीदेखील राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचा उत्साह त्यांच्यात दिसून येत होता. त्यांना पाहून तरुणांनादेखील प्रेरणा मिळत होती.
धरमपेठ येथील हिंदी प्राथमिक शाळेत लक्ष्मी दौलतराव लोहारकर या ९६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक दुचाकीवर बसून नातेवाईकासह मतदानासाठी पोहोचल्या. त्यांचे हात थरथरत होते, मात्र जिद्द कायम होती. मतदान केंद्राच्या आत त्यांना व्हीलचेअरवर नेण्यात आले. योग्य मतदान झाले तर देशाचा विकास होईल अशी त्यांची भावना होती. याशिवाय वर्धा मार्गावरील रामकृष्ण नगरातील सुलभा भास्कर जोगळेकर (८२) यांनी पुण्याहून आलेल्या नातवासोबत जिद्दीने जाऊन मतदान केले. प्रत्येक नागरिकाने आपला अधिकार बजावलाच पाहिजे. यातूनच लोकशाही समृद्ध होईल. उन्हाची पर्वा न करता नागरिकांनी घराबाहेर निघावे असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे त्यांनी नातवाला सेल्फी काढायला लावून ती नातेवाईक व ओळखीच्या लोकांना पाठवत मतदान करण्यास सांगितले.