नागपूर : नागपुरात दाट धुकं पसरल असून शहर धुक्याने झाकून गेलयं. आज नागपुरकरांना सुर्यदेवतेच दर्शनही झालं नाही. नागपुरात गेली दोन दिवस थंडीचा जोर कमी झाला पण गारठा वाढलाय. यातच आज शहरभर धुक्याची चादर पसरली असून शहरवासीयांनी धुक्यातून भटकंतीचा अनुभव घेतला.
मागील २४ तासांत नागपुरात कमाल तापमानाची नोंद १४.४ अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. गोंदियात सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर यवतमाळचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपुरात दिवसभराच्या तुलनेत सायंकाळनंतर तापमानात बरीच घट झाली. यामुळे सायंकाळनंतर रस्त्यावरील वर्दळही बरीच कमी झालेली पाहण्यात आली.
प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात २८ व २९ तारखेला पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. खात्याच्या अंदाजानुसार अंदाजानुसार, २८ आणि २९ डिसेंबरला काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व तुरळक मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली असून ३० डिसेंबरला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाली असतानाच सोमवारी सायंकाळनंतर अचानकपणे वातावरण अधिकच थंडावले आहे. पाऊस आल्यास विदर्भात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे.