लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडळाची (वर्धा आणि नागपूर जिल्हा) वीजहानी राज्यात सर्वात कमी आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे येथील वीजहानी ०.७७ टक्के कमी करण्यात यश मिळवीत सर्वात कमी वीजहानी असलेल्या परिमंडळांच्या यादीत ७.०४ टक्के वीजहानीसह राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. इतकेच नव्हे तर पुणे, भांडुप आणि कल्याण यासारख्या सशक्त परिमंडळांनाही मागे टाकले आहे.नागपूर परिमंडळाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये वीज बिल वसुली आणि थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात मिळविलेले यश, वीजचोरीविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका यासारख्या विविध आघाड्यांवर केलेल्या उपाययोजनांचे फलित म्हणजे परिमंडळाच्या हानीत तब्बल ०.७७ टक्क्याने घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाला होणाऱ्या वीजपुरवठ्यात ६.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर त्यातुलनेत उच्चदाब वीजविक्री ९.६५ टक्क्यांनी वाढली आहे; याशिवाय लघुदाब गैरकृषी वीजविक्री २ टक्क्यांनी वाढली आहे तर कृषिपंपाकरिताची वीजविक्री ६.७० टक्क्यांनी वाढली आहे, अशाप्रकारे नागपूर परिमंडळाची एकूण वीजविक्री आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ७.१४ टक्क्यांनी वाढली आहे.नागपूर परिमंडळासोबतच नागपूर परिक्षेत्रातील पाचही परिमंडळांनी वीजहानी कमी करण्यात यश मिळविले आहे. यात अकोलाची वीजहानी २.६४ टक्क्यांनी कमी होऊन १९.९१ टक्के झाली आहे तर अमरावती वीजहानी १.१९ टक्क्यांनी कमी होऊन १५.८० टक्के झाली आहे. याशिवाय चंद्र्रपूरची वीजहानी ०.४१ टक्क्यांनी कमी होऊन १०.७३ टक्के तर गोंदियाची वीजहानी ०.६० टक्क्यांनी कमी होऊन १५.५३ टक्क्यांवर आली आहे.
यावर्षीही वीजहानी कमी राहणारनागपूर जिल्ह्याने विजेच्या बाबतीत राज्याला एक आदर्श उदाहरण घालून द्यावे, याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा नेहमीच कटाक्ष असतो. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हे यश मिळाले आहे. नागपूर शहरातील तीन विभाग फ्रेंचायसीला मे २०११ मध्ये देण्यात आले, त्यावेळी ३५ टक्क्यांहून अधिक वीजहानी होती. ती २०१६-१७ मध्ये १५.६१ टक्क्यांवर आली तर २०१७-१८ साली वीजहानी १४.६३ टक्क्यांवर आली. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्येही फ्रेंचायसीसह नागपूर परिमंडळाची वीजहानी राज्यात सर्वाधिक कमी राहील, असा विश्वास नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी व्यक्त केला आहे.