अकोला : विदर्भातील प्रवाशांना गोव्याची वारी घडविणाऱ्या नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली असून, अकोला मार्गे धावणारी ही गाडी आता ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालविण्यात येणार आहे. या गाडीला अकोल्यात थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
विदर्भातून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गतवर्षी दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव-नागपूर (०११३९/०११४०) या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाडीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अधिसूचित असलेल्या अप व डाऊन मार्गावरील गाडीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५२ फेऱ्या होणार आहेत.
..असे आहे वेळापत्रकसुधारित वेळापत्रकानुसार, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस (०११३९) ही द्विसाप्ताहिक गाडी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत नागपूर स्थानकावरून दर बुधवार व शनिवारी दुपारी ३.०५ मिनिटांनी सुटून मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव-नागपूर एक्स्प्रेस (०११४०) ही द्विसाप्ताहिक गाडी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दर गुरुवार व रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.
कोणत्या स्थानकांवर थांबा?नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम (गोवा) तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे.