नागपूर : महामेट्रोनागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दोन प्रकल्पांना प्रतिष्ठेचा आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा सन्मान प्राप्त झाला आहे. याआधी महामेट्रोला अनेक महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या कुशल नेतृत्वात हे पुरस्कार मिळाले आहेत.
वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर मेट्रो रेल्वे एकत्रित आहे. डबल डेकर व्हायाडक्टसह पहिल्या स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि दुसऱ्या स्तरावर मेट्रो रेल्वेचे संचालन करण्यात येत आहे. त्यामुळे जमिनी मार्गासह तीन स्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त जागेच्या अधिग्रहणाची गरज भासली नाही. तसेच जमिनीची किंमत, बांधकामाचा वेळ तसेच प्रकल्पाचा खर्च कमी झाला. ३.१४ किमी लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टमध्ये छत्रपतीनगर, जयप्रकाशनगर आणि उज्वलनगर अशी तीन मेट्रो स्टेशन आहेत. या स्थानकांचा अभियांत्रिकी विचार, प्रक्रिया, संकल्पना, डिझाईन आणि अंमलबजावणी आव्हानापेक्षा कमी नव्हते.
याआधीही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे मार्च २०१७ मध्ये ‘सेफ्टी ॲट वर्क’ या विषयावर सर्वांत मोठी मानव श्रृंखला बनविण्याकरिता नोंद झाली होती. या शृंखलेत महामेट्रोचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि इतर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. महामेट्रो उत्कृष्टरीत्या प्रकल्पाचे नियोजन, संचालन आणि अंमलबजावणी करीत असल्याचे द्योतक आहे.