लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉक-४ मध्ये ऑड-इव्हन सुरू झाल्यानंतर दुकाने खुली झाली आहेत. पण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होण्याऐवजी फूटपाथवरील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची जास्त गर्दी दिसून येत आहेत. याशिवाय मॉलमध्ये ग्राहकांचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना खर्चही काढणे कठीण झाले आहे. खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला जात आहे. मॉल ग्राहकाविना तर फूटपाथवर गर्दी, असे बाजारात चित्र दिसून येत आहे.इतवारी, गांधीबाग, महाल, सीताबर्डी बाजारात फूटपाथवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचे भय दिसून येत नाही. फूटपाथवरील गर्दीने प्रशासन चिंतेत असून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ही दुकाने बंद करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.व्यापाऱ्यांनी सांगितले की, मॉलमध्ये ग्राहक नसल्याने संचालक खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कमी करीत आहेत. शासनातर्फे शोरूम संचालकांना कोणतीही मदत मिळत नाही. शासनाने इंडस्ट्रीच्या विविध वर्गाला मदत देऊ केली आहे. शोरूम संचालक आता काम करण्याच्या स्थितीत नाहीत. आर्थिक संकटात त्यांना दिवस काढावे लागत आहे. याशिवाय शोरूमचे भाडे चुकते करणेही शक्य नसल्याने अनेकजण बंद करण्याच्या तयारीत आहेत. ग्राहक सध्या केवळ आवश्यक वस्तूंचीच खरेदी करीत आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी नंतरही करता येऊ शकते. यामुळे मोठ्या शोरुममध्ये ग्राहक येत नाहीत. केवळ रविवारी ग्राहक येतात, इतर दिवशी कुणीही येत नाहीत. बाजाराप्रमाणेच मॉलमध्येही आॅड-इव्हनमध्ये सूट दिलेली आहे. त्यामुळे शोरूम आणि दुकाने दररोज उघडत आहेत.नागपुरात जवळपास ८ ते १० मोठे शॉपिंग मॉल आहेत. यामध्ये रेडिमेड गारमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम जास्त आहेत. लॉकडाऊन लागले तेव्हा उन्हाळ्याचा सिझन सुरू झाला होता. तेव्हा कपड्यांचे ऑर्डर दिले होेते. पण शोरूम बंद झाल्याने कपडे विकले गेले नाहीत. उन्हाळ्याचा स्टॉक पडून आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचाही साठा आहे. कुलर आणि एसी विक्रीविना पडून आहेत. सर्व शोरूम वातानाकुलित आहेत. हे युनिट सुरू ठेवण्यासाठी विजेचे जास्त बिल येत असल्याने ते बंद केले आहेत.व्यापारी म्हणाले, ही स्थिती डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॉलमध्ये नवीन माल बोलविण्यावर संचालक तयार नाहीत. वीजबिल, कर्मचाऱ्यांचा खर्च काढणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहेत तर दुसरीकडे फूटपाथवर गर्दी वाढत आहे. हीच स्थिती राहिली तर काही दिवसात शहरातील मॉल बंद होतील.
नागपुरात मॉल ग्राहकाविना तर फूटपाथवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:06 PM
अनलॉक-४ मध्ये ऑड-इव्हन सुरू झाल्यानंतर दुकाने खुली झाली आहेत. पण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होण्याऐवजी फूटपाथवरील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची जास्त गर्दी दिसून येत आहेत. याशिवाय मॉलमध्ये ग्राहकांचा अभाव आहे.
ठळक मुद्देनागरिकांना कोरोनाचे भय नाही : फूटपाथवरील गर्दीने प्रशासन चिंतेत