लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोतवालीत राहणाऱ्या एका व्यक्तीची मालेगाव (जि. वाशिम) जवळ हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मृत व्यक्तीचा फोटो घरमालकाने ओळखला अन् त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले.
माधव पवार असे मृताचे नाव असल्याचे बोलले जाते. तो महाल, तुळशीबागेत एका भाड्याच्या घरात राहत होता. वाशिम जिल्ह्यातील मालेगावनजीकच्या पांगरीकुटे शिवारात त्याची गोळी घालून अज्ञात आरोपीने हत्या केली. सकाळी ही घटना उघड होताच मालेगाव पोलिसांनी तपास सुरू केला. मृताच्या कपाळावर गोळी घातल्या गेल्यामुळे त्याचा चेहरा पुरता बिघडला होता. मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्याने मालेगाव पोलिसांना मृताची ओळख पटविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. दरम्यान, सायंकाळी मृताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो पवारच्या घरमालकाच्या पाहण्यात गेल्याने त्याची ओळख पटली. त्यानंतर कोतवाली पोलीस संबंधित घरमालकाकडे पोहचले.
सूत्रांच्या माहितीनुसार, पवार पाच वर्षांपूर्वी या घरमालकाकडे राहत होता. तो अलीकडे कुठे राहत होता, ते उघड झाले नाही. त्याची पत्नी लकडगंज परिसरात राहत असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. वृत्त लिहिस्तोवर या संबंधाने अधिक माहिती उघड झाली नव्हती.
---
‘एमआर लव दिल’
मृताच्या छातीच्या डाव्या भागावर ‘एमआर लव दिल’ असलेला टॅटू गोंदलेला आहे. ही हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली ते बघता या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असावी, असे पोलीस खासगीत सांगतात. दरम्यान, सोमवार दुपारपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्यात यश येईल, असा विश्वासही पोलीस व्यक्त करीत होते.
----