लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा महिन्यांपासून माहेरी राहणाऱ्या एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रारंभी तपासणीत विवाहितेने मानसिक त्रासापायी आत्महत्या केल्याचा संशय आहे.चिटणीस पार्कजवळील निवासी ३४ वर्षी रिया उर्फ पौर्णिमा सुमित अवथनकर हिचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. रियाचा पती पुणे येथे इंजिनिअर आहे. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये पतीसोबत वाद झाल्यानंतर रिया आई - वडिलांच्या घरी आली होती. त्यानंतर ती सासरी गेलीच नाही. यादरम्यान रियाचे पती आणि वडिलांना कोविड झाला होता. पतीची तब्येत जास्त बिघडली होती. कोविड सुधारल्यानंतर पती - पत्नीच्या नात्यात सुधारणा झाली होती. दोन दिवसांपूर्वीच रियाने मुलाचा जन्मदिवस साजरा केला होता. १४ मे रोजी रियाचा जन्मदिवस होता. पती सुमितने रियाच्या नातेवाईकांना १४ मे रोजी नागपुरात येऊन रियाला सरप्राईज देणार असल्याचे सांगितले होते. या कारणामुळे रियाचे कुटुंबीय दोघांचा संसार सामान्य होण्याची वाट पाहात होते.
मंगळवारी सकाळी रियाने पहिल्या माळ्यावरील हॉलमध्ये गळफास घेतला. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. कोतवाली ठाण्याच्या महिला पीएसआय तराडे घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांना रियाची सुसाईड नोट मिळाली. त्यात तिने स्वमर्जीने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. मुलाच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करताना आई नेहमीच त्याच्यासोबत राहणार असल्याचे तिने नमूद केले आहे. मृत्यूनंतर धार्मिक विधी करू नये, असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. रियाच्या मृत्यूने कुटुंबीय तणावात आहेत. तिने मानसिक तणावात टोकाचे पाऊल उचलल्याची शंका आहे.
तरुणीने घेतला गळफास
घरगुती काम करणाऱ्या एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धंतोली, तकिया निवासी २८ वर्षीय तरुणी घरगुती काम करीत होती. तिने मंगळवारी सकाळी गळफास घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून गुन्हा नोंदविला आहे.