लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसली तरी पीडितांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना भेटून आपबिती सांगितली.मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील एका उच्चशिक्षित कुटुंबातील मुलाला त्याच्याच गावातील ओळखीच्या महिलेने नागपूर मेडिकलमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात प्रवेश देण्याचे आमिष दाखविले. त्या महिलेने एका रहमान नावाच्या गृहस्थासोबत ओळख करून दिली. त्याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियातील नागपूर मेडिकलचे खोटे दस्तावेज दाखवून त्यांचा विश्वास जिंकला. मेडिकल प्रशासनाशी थेट संबंध असल्याने एमबीबीएसला प्रवेश देण्यास अडचण जाणार नाही, असा आत्मविश्वासही दाखविला. विशेष म्हणजे, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) देणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्याने अशी कुठलीही परीक्षा दिलेली नसताना त्याच्या कुटुंबीयांना मुलगा डॉक्टर होईल, असे स्वप्न दाखविण्यात आले. त्यांच्याकडून कधी २५ हजार तर कधी ३० हजार असे करून आतापर्यंत अडीच लाख उकळले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रवेशासंदर्भातील हालचाली बंद झाल्याने आणि समोरील व्यक्तीकडून प्रतिसाद मिळेनासा झाल्याने कुटुंबीयांचा संशय वाढला. शहानिशा करण्यासाठी शनिवारी थेट मेडिकल गाठले. येथे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना भेटून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. डॉ. निसवाडे यांनी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा ‘नीट’ देणे आवश्यक असून त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही, तुमची फसवणूक झाल्याचे सांगून झालेल्या प्रकाराची तातडीने पोलिसांमध्ये तक्रार करण्याची सूचना केली; सोबतच प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती पारदर्शक असून ती संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचेही त्यांना सांगितले. परंतु सायंकाळपर्यंत अजनी पोलीस ठाण्यात अशी कुठलीही तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. गेल्या चार-पाच महिन्यांत मेयो, मेडिकलमध्ये अशा लुबाडणुकीच्या प्रकारात वाढ झाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
नागपुरात एमबीबीएस प्रवेशासाठी अडीच लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:03 AM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसली तरी पीडितांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना भेटून आपबिती सांगितली.
ठळक मुद्देमेडिकलमधील घटना : व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे दाखविले आमिष