- नरेश डोंगरे नागपूर - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला गेल्या वर्षी बसलेला फटका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मान्सून पूर्वीच पूराचा धोका टाळणाऱ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी, २३ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर रेल्वे यार्डमधील सर्व ट्रॅक पाण्याखाली आले होते. पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नागपूर मार्गे धावणारी रेल्वे वाहतूक ठप्पा झाली होती.
अकोला जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातही वेगवेगळ्या वेळी काहीशी अशीच स्थिती निर्माण झाल्याने त्या त्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्यांना फटका बसला होता. परिणामी रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला होता. या संबंधाने प्रचंड ओरड झाली होती आणि थेट दिल्लीपर्यंत तक्रारीही झाल्या होत्या. ते सर्व लक्षात घेऊन यावेळी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेल्वे गाड्यांच्या संचालनावर परिणाम होऊ नये याची आतापासूनच काळजी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत रेल्वे रुग्णालय, नागपूरच्या मागे असलेल्या पुलाच्या बॅरल आणि नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. ११५ मीटर लांबीच्या पुलाच्या बॅरलच्या साफसफाईच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील साफसफाईचे काम सुरू केले जाणार असून त्यासाठी महापालिका प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. यातून पुलाच्या वरच्या भागातील नाल्याचीही सफाई केली जाणार आहे.
पुलाच्या बॅरल आणि नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या साफसफाईमुळे अतिवृष्टीदरम्यान पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे पुराचा संभाव्य धोका टाळला जाणार आहे. नागपूर रेल्वे यार्डला पुरापासून मुक्त ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच केल्या जात आहे. याव्यतिरिक्त, नदीच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही काठावरील नाल्याला लागून असलेल्या भागांना देखील पुराचा धोका कमी होणार आहे.