लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, सध्या मेडिकलमध्ये याच आजाराचे २५वर रुग्ण उपचार घेत आहेत. यातच रुग्णालयाच्या परिसरात, डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, परिचारिका व कर्मचाऱ्यांना हा आजार होण्याचा धोका वर्तविला जात आहे.डेंग्यू व स्क्रब टायफससह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मेडिकलमध्ये डेंग्यूसारख्या आजाराने नुकताच एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे, तर ४०च्या वर डेंग्यूचे रुग्णांची नोंद आहे. अशाही स्थितीत सर्वकाही आलबेल आहे, असेच दाखवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून होत आहे. मात्र, परिस्थिती अतिशय वाईट आहे. मेडिकल परिसरातील विविध वसतिगृहातील विद्यार्थी डेंग्यूच्या विळख्यात सापडले आहेत. आता यात निवासी डॉक्टरांची भर पडली आहे.सूत्रानुसार, शासकीय दंत महाविद्यालयातील (डेंटल) आठच्यावर विद्यार्थी तर मेडिकलचे तीनच्या वर विद्यार्थी आणि चारवर निवासी डॉक्टर विविध वॉर्डात डेंग्यूवर उपचार घेत आहेत. मेडिकल रुग्णालयाच्या परिसरात डेंग्यू वाढत असताना अद्यापही उपाययोजना हाती घेण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या मते, वसतिगृहांमध्ये व परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. यातच सांडपाण्याची पाईपलाईन काही ठिकाणी बुजल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु साधी फवारणी करण्यात आली नसल्याचे विद्यार्थी व निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.डेंग्यूची चाचणीही बंदडेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णाची ‘एनएस१’ चाचणी केली जाते. पहिल्या पाच दिवसांत ही चाचणी उपयोगी ठरते. त्यानंतर ही चाचणी निगेटिव्ह येते. यामुळे दुसरी ‘आयजीएम’ ही चाचणी करावी लागते. तर यापूर्वी डेंग्यूचे संक्रमण झाले आहे का हे पाहण्यासाठी ‘आयजीजी’ ही चाचणी करावी लागते. रुग्णाच्या दृष्टिकोनातून या तीनही चाचण्या महत्त्वाच्या आहेत. परंतु गेल्या आठवड्यापासून या चाचण्या बंद पडल्या आहेत.