लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) गर्दीत ११ वर्षीय मुलगी हरवली. याची माहिती तिच्या आईवडिलांनी सुरक्षारक्षकांना दिली. रक्षकांनी मेडिकलचा संपूर्ण परिसर पिंजून काढत दोन तासात मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिले. ‘एमएसएफ’च्या जवानांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून मेडिकलची ओळख आहे. या मेडिकलमध्ये विदर्भासह, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातून रुग्ण येतात. मेडिकलचा परिसर खूप मोठा आहे. त्यामुळे माहिती नसल्यास गोंधळ उडतो. यातच रुग्णांवर उपचारासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू असते. गर्दी असल्याने जरासे दुर्लक्ष झाल्यास नातेवाईकांची ताटतूट होण्याची शक्यता असते. अशीच घटना सोमवारी समोर आली. ओडिशा राज्यातील हेमलता रवींद्र मल ही महिला प्रसुतीसाठी रुग्ण वॉर्ड न.३० मध्ये भरती होती. सोमवारी दुपारी १ च्या सुमारास तिला दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित केले. त्यांची ११ वर्षांची मुलगी श्रुती सोबतच होती. मात्र, आईला घेऊन जात असताना अचानक दोघांची ताटातूट झाली. मुलगी दिसेनाशी झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नाही. शेवटी, रवींद्र मल महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) चे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी कि. ज. पाडवी व सुरक्षा पर्वेक्षक लक्ष्मीकांत इंगोले यांच्याजवळ पोहोचले. मल यांनी मुलगी हरविल्याची तक्रार केली. घटनेचे गांभीर्य पाहता पाडवी व इंगोले यांनी अंकुश खानझोडे, गोपीचंद नानवटकर, चंद्रभान मोरेशीया, परमेश्वर डोंगरे व विकास चव्हाण आदी सुरक्षारक्षकांना मुलीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. सुरक्षारक्षकांनी संपूर्ण मेडिकलचा परिसर पिंजून काढला. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर दुपारी ३ वाजताच्या सुमारास श्रुती ‘ओपीडी’च्या मागील बाजूस फिरताना दिसली. सुरक्षारक्षकांनी श्रुतीला ताब्यात घेतले. श्रुती नजरेने दिसताच आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.