लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) गोंदियाच्या एमबीबीएस तृतीय वर्षाची मान्यता वाचविण्यासाठी गेल्या आठवड्यात मेडिकलच्या सहा सहयोगी प्राध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता मेडिकलच्या तीन, मेयोच्या एक तर यवतमाळ मेडिकलच्या एका प्राध्यापकाची बदली गोंदिया मेडिकलसाठी करण्यात आली आहे. परिणामी, या प्राध्यापकांच्या नावावर ज्या वाढीव पदव्युत्तर जागांची मागणी केली होती, ती आता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, बदल्यांसाठी नागपूर मेडिकल, मेयोच का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) चमूने गेल्या वर्षी गोंदिया मेडिकल येथील अल्प मनुष्यबळाच्या त्रुटीला घेऊन ताशेरे ओढले होते. या वर्षी ती स्थिती निर्माण होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने नव्या जागा न भरता डॉक्टरांची पळवापळवी सुरू केली आहे. गेल्याच आठवड्यात मेडिकलच्या सहा तर मेयोच्या एका असे एकूण सात सहयोगी डॉक्टरांच्या बदल्या गोंदिया मेडिकलसाठी केल्या होत्या. आता पाच प्राध्यापकांच्या बदल्यांची ‘आॅर्डर’ काढली आहे. यात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) जीवरसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. भालचंद्र मुरहार , क्ष-किरण विभागाच्या प्राध्यापक डॉ. आरती आनंद, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जे.के. देशमुख तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) शरीरक्रियाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मृणाल फाटक व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळच्या औषधशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. सुजाता दुधगावकर यांची बदली गोंदिया मेडिकलसाठी करण्यात आली आहे. डॉ. दुधगावकर यांनी स्वत:हून येथे बदली मागितली होती. परंतु इतर चार प्राध्यापकांची बदलीचे आदेश आश्चर्य व्यक्त करणारे आहे, अशी प्रतिक्रिया अनेक वरिष्ठ डॉक्टरांची आहे. त्यांच्यानुसार ‘एमसीआय’ने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यानुसार नागपूर मेडिकलच्या विविध अभ्यासक्रमाच्या साधारण ३५ जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु ज्या प्राध्यापकांच्या नावाने या जागा वाढविण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला, त्या प्राध्यापकांची बदली झाल्याने ‘पीजी’च्या जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे.