सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध तसेच विविध आधारांच्या कारणासंबंधी संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी देहदान ही काळाची गरज आहे. याचे महत्त्व लोकांना आता कळू लागल्याने, मृत्यूनंतर देहदानाचे प्रमाण वाढू लागले आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षाला २० ते २४ तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दरवर्षाला १५ ते २० देहदान होत आहे. विशेषत: मेडिकलनेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) विविध मेडिकल कॉलेजला आतापर्यंत २० मृतदेहाची मदत केली आहे.वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शरीररचनाशास्त्र हा वैद्यकीय शिक्षणाचा पाया आहे आणि यासाठी देहदान गरजेचे आहे. जो प्रत्येक जण सहज करू शकतो. पूर्वी या दानाला घेऊन उदासीनता होती. परंतु जनजागृतीमुळे हळूहळू देहदानाची संख्या नागपुरात वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, नागपूर हे देहदानाची जन्मभूमी आहे. मेडिकलमध्ये यावर्षीपासून एमबीबीएसला २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. निकषानुसार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह असणे गरजेचे आहे. मेडिकलमध्ये सद्यस्थितीत ३० मृतदेह आहेत. यामुळे नियमानुसार विद्यार्थ्यांना मृतदेह उपलब्ध करून दिला जात आहे. मेयोमध्ये २०० विद्यार्थी असून, येथे २० मृतदेह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.मेडिकलने ‘एम्स’ला दिले सहा मृतदेहमेडिकलमध्ये देहदानाची संख्या वाढली आहे. यामुळे गेल्या चार वर्षात मेडिकलने इतर वैद्यकीय कॉलेजला २० मृतदेह पुरविले आहेत. यात नागपूर ‘एम्स’ला सहा, चंद्रपूर मेडिकल कॉलेजला चार, गोंदिया मेडिकल कॉलेजला चार, अकोला मेडिकल कॉलेजला दोन तर अंदमान-निकोबार मेडिकल कॉलेजला चार मृतदेहाची मदत केली आहे.‘कॅडेव्हर लॅब’चा प्रस्तावमेडिकलमध्ये उपलब्ध होत असलेल्या मृतदेहाची संख्या लक्षात घेऊन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी ‘कॅडेव्हर लॅब’ म्हणजे मृतदेह प्रयोगशाळेचा प्रस्ताव तयार केला आहे. या ‘लॅब’मधून शल्यचिकित्सेमध्ये कौशल्य विकसित करणे, शस्त्रक्रियेतील चुका टाळून अचूकता आणणे व डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या ‘लॅब’साठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.देहदानाला नैसर्गिक मृत्यूच्या दाखल्याची समस्यानागपूरचे मेयो, मेडिकल सोडल्यास इतर शासकीय व खासगी रुग्णालयाला नेहमीच देहदानाची प्रतीक्षा असते. या दानाला नैसर्गिक मृत्यूचा दाखल्याची आडकाठी येत असल्याचे समोर आले आहे. ‘बॉम्बे अॅनाटॉमी अॅक्ट १९४९’ नुसार मृतदेह स्वीकारण्याकरिता नैसर्गिक मृत्यूच्या दाखल्याची गरज असते. परंतु अनेक डॉक्टरांकडून हा दाखला मिळण्यास अडचण जाते. यामुळे नातेवाईकांची इच्छा असूनही देहदान होत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. शासनाने यात लक्ष घालणे आवश्यक आहे.-चंद्रकांत मेहर, अध्यक्ष,देहदान सेवा संस्था
देहदानातील २० मृतदेहाची नागपूर मेडिकलकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:00 AM
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) विविध मेडिकल कॉलेजला आतापर्यंत २० मृतदेहाची मदत केली आहे.
ठळक मुद्दे‘एम्स’सह विदर्भातील तीन रुग्णालयांना पुरविले मृतदेह मेयो, मेडिकलमध्ये वर्षाकाठी १५-२० देहदान