नागपूर : शहरातील तापमानाचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कूलर, एसीची सोय करण्यात आली आहे; परंतु तरीही काही सरकारी कार्यालयात रिकाम्या खुर्च्याच एसी कूलरचा गारवा घेत असल्याची अनुभूती काही कार्यालयात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय : दुपारी २ वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उन्हाची झळ पोहोचू नये म्हणून प्रत्येक कार्यालयात कूलरची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवांतपणे आपले कायम करता येऊ शकते; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कक्षांमध्ये डोकावून बघितले असता, कूलर सुरू होता, पंखे सुरू होते; पण कर्मचारी नव्हते. कर्मचारी ४५ डिग्री तापमानात सर्व सोयीसुविधा असताना गेले तरी कुठे, हा प्रश्न अनेकांना पडला होता.
महापालिका : दुपारी ३ वाजता : महापालिकेच्या इमारतींमध्ये अनेक विभागांची कार्यालये आहेत. महापालिकेने तर उन्हापासून कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी एसी व कूलरचीही सोय केली आहे. पंखे तर ठिकठिकाणी आहेतच. असे असतानाही काही ठिकाणी कर्मचारी दिसून आले नाही. उलट अभ्यागत त्यांच्या प्रतीक्षेत पंख्याखाली बसलेले नजरेस आले. अभ्यागतांना विचारले असता तासभरापासून कर्मचारी नाही, त्यामुळे त्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
- पारा ४५ अंशांवर
विदर्भात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. तापमानाने ४५ डिग्री गाठली आहे. घराबाहेर पडताना उन्हाच्या झळा चांगल्याच बसत आहे. ज्यांचे फील्ड वर्क आहे. त्यांच्यासाठी उन्हाळा हा जीवघेणाच आहे. अशात सरकारी कार्यालयात केलेल्या सोयीसुविधा लक्षात घेता, कर्मचाऱ्यांनी किमान कार्यालयीन वेळेत जागेवर थांबून सोपवलेले काम करणे अपेक्षित आहे.
- सरकारी कर्मचारी आहेत ते...
कामासाठी महापालिकेत आलेले काही अभ्यागत एका पंख्याखाली प्रतीक्षा करीत होते. त्यांना विचारणा केल्यावर म्हणाले की सरकारी कर्मचारी आपल्या वेळा चुकवित नाही. जेवणाची सुट्टी त्यांच्यासाठी एक ते दीड तासाची असते. आम्ही काम झाले पाहिजे म्हणून उन्हातान्हात येतो; पण यांच्यासाठी आमचे काम फार महत्त्वाचे नसते. आपण तरी काय बोलणार? आपण आहोत तरी कोण? ते सरकारी कर्मचारी आहेत. काही बोलले तर कामात अडथळा आणला म्हणून आपल्यालाच आत टाकायचे.
योगेश भस्मे, नागरीक