लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसात विदर्भातील तापमानात अचानक मोठ्या फरकाने घट झाली आहे. बुधवारपासून थंडीची चाहुल लागली आणि रात्रीचा पारा तब्बल ५ डिग्रीने घसरला. तापमान घटल्याने सायंकाळनंतर बाहेर पडताना गारठ्याची तीव्र जाणीव होऊ लागली आहे. शनिवारी किमान तापमानात १ अंशाची वाढ होऊन १३.७ अंशाची नोंद करण्यात आली. मात्र पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी घट होणार असून ते १० अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने नोंदविला आहे. दरम्यान शनिवारी विदर्भात यवतमाळ येथे सर्वात कमी ११.५ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली.
विदर्भात दरवर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यात थंडीला सुरुवात हाेते. मात्र यावेळी नाेव्हेंबर महिन्यातच थंडीने हुडहुडी भरवली आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात थंडीचे आगमन झाले. ३ नाेव्हेंबरपर्यंत तापमान सामान्य हाेते, मात्र ४ तारखेला हवामानाने कुस बदलली. ५ राेजी अचानक तापमानात ३.४ डिग्रीची घसरण झाली. नागपुरात बुधवारी व गुरुवारी १२.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. शनिवारी त्यात एक अंशाने थाेडी वाढ झाली पण रात्रीचा गारठा कायम आहे. कमाल तापमान ३२.४ डिग्री नाेंदविण्यात आले. आर्द्रता मात्र ५७ टक्के हाेती. सकाळी उन पडल्यानंतरही ९ वाजतापर्यंत हवेचा गारवा जाणवताे. यावर्षी थंडीचा जोर जास्त राहणार असल्याचे संकेत आहेत.
पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी घट हाेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने नाेंदविला आहे. अंदाजानुसार ८ नाेव्हेंबरला १.५ डिग्रीची घट हाेऊन १२ अंशावर पाेहचेल. ९ व १० राेजी त्यात पुन्हा घट हाेउन पारा ११ अंशावर पाेहचेल. ११ नाेव्हेंबरला १० अंश पाेहचेल असा अंदाज आहे. दिवाळीचा उत्सवही गुलाबी थंडीत जाणार हे निश्चित.