नागपूर : वेगाने विकास होणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आता मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सहकार्य मिळणार आहे. नागपूर मेट्रोने अलीकडेच आयआयटी मुंबईसोबत करार केला आहे. याअंतर्गत संस्था ‘अॅडव्हान्स आयटी बेस्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम’साठी सल्ला देणार आहे. उपरोक्त सिस्टिम हस्तगत करण्यासाठी नागपूर मेट्रो प्रयत्नरत आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मची विशेष ख्याती आहे. यामुळे साईटवर वास्तविक बांधकाम सुरू करण्याआधी ५ डी बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट (बीआयएम) टूल्सच्या माध्यमातून संपूर्ण प्रकल्पाच्या सुट्याभागांना एकत्रित करता येईल. वेळेत काम पूर्ण करणे, गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे, चुका सुधारण्याचे काम आदी डिजिटल प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. या सिस्टिमच्या माध्यमातून गुंतवणूक आणि कामाच्या वेळेवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. भारतात पहिल्यांदा कोणत्याही प्रकल्पाच्या उभारणीसाठी अशा अॅडव्हान्स मॅनेजमेंट टूल्सचा उपयोग करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये (एनएमआरसीएल) डिजिटल प्लॅटफॉर्मच्या डिझाईनचे नियोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते अनोखे ठरणार आहे. भारतीय आयटी कंपनी एल अॅण्ड टी इन्फोटेकने नागपूर मेट्रोसाठी आयटी प्लॅटफॉर्म देण्याची तयारी दर्शविली आहे. (प्रतिनिधी)
नागपूर मेट्रोचा आयआयटी-मुंबईशी करार
By admin | Published: June 19, 2015 2:40 AM