लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याची घोषणा सोमवारी, ४ मार्चला होण्याची शक्यता आहे. खापरी स्टेशनवर होणाऱ्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.देशात युद्धजन्य परिस्थिती आणि लवकरच आचारसंहिता लागणार असल्यामुळे पंतप्रधानांना प्रत्यक्ष नागपुरात उद्घाटनासाठी येणे शक्य नाही. त्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. यापूर्वीही पंतप्रधानांनी या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवून मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. ६ मार्च रोजी नागपुरात मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी मेट्रो प्रकल्पाला पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखविण्याची शक्यता आहे. त्यानंतर मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे.
‘सीएमआरएस’ने केली मेट्रो प्रकल्पाची पाहणीमेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे (सीएमआरएस) रविवारी महामेट्रो नागपूर प्रकल्पाची पाहणी केली. ‘सीएमआरएस’च्या तीन सदस्यीय पथकाचे नेतृत्व केंद्रीय मंडळ मुंबईचे रेल्वे सुरक्षा आयुक्त अरविंदकुमार जैन यांनी केले असून, त्यांच्यासोबत रेल्वे सुरक्षा उपायुक्त जी.पी. गर्ग आणि ई. श्रीनिवासन उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या पाहणी दौऱ्यात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याची प्रगती आणि प्रकल्पाची माहिती दिली. मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे आॅडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. सीएमआरएसने मिहान डेपोचा दौरा केला. कागदपत्रांची पाहणी करून रोलिंग स्टॉकचे निरीक्षण केले. यात मेट्रोच्या इमर्जन्सी फ्रंट डोअर इव्हॅक्युव्हेशन आणि सुरक्षा उपकरणांसह कोचेससंबंधित इतर सर्व उपकरणांची तपासणी केली. सीएमआरएस अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि इंटरचेंज मेट्रो स्टेशनची पाहणी केली. प्रवासी सेवेसाठी स्टेशनचे बांधकाम, स्टेशनवर लावण्यात आलेले आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट, अग्निरोधक उपाय, एस्केलेटर, लिफ्ट, विद्युत उपकरणे, टेलिकॉम, आपात्कालीन यंत्रणा व इतर सर्व सोयीसुविधांची पाहणी सीएमआरएसने केली.दरम्यान, एअरपोर्ट स्टेशनवर मॉकड्रील करण्यात आली. सीएमआरएस पथकाने इंटरचेंज स्टेशन ते साऊथ स्टेशनदरम्यान मेट्रोने प्रवास केला. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित ब्रेक, आसन व्यवस्था, डिजिटल स्क्रीन, निर्गमन गेट, संवाद कायम ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या उपकरणांची पाहणी अधिकाºयांनी केली. या संपूर्ण दौºयासाठी महामेट्रो नागपूर प्रकल्पाचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अॅण्ड सिस्टीम्स) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग, कार्यकारी संचालक (वरिष्ठ मुख्य प्रकल्प अधिकारी) देवेंद्र रामटेककर, व्ही. के. अग्रवाल, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आवश्यक दोन्ही महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. आरडीएसओने केलेल्या पाहणीनंतर आरडीएसओचे प्रमाणपत्र महामेट्रोला मिळाले आहे. रविवारी सीएमआरएसने केलेल्या पाहणीनंतर आता सीएमआरएस प्रमाणपत्र मिळताच प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.