लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेच्या नागपूर प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवार, ७ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविणार आहे. उद्घाटन समारंभ मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे ‘माझी मेट्रो’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.उद्घाटनप्रसंगी एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहबांधणी व नागरी कामकाज मंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार, आमदार, महापौर आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतील.प्रकल्पाला सीएमआरएसचे प्रमाणपत्र३ मार्चला झालेल्या सीएमआरएसच्या परीक्षणानंतर रेल्वे बोर्डाकडून नागपूर प्रकल्पाला मंगळवार, ५ मार्चला सायंकाळी सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मेट्रो रेल्वेच्या प्रवासी सेवेसाठी मिळाले असून, महामेट्रोच्या साडेतीन वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. हा ऐतिहासिक क्षण असून त्याबद्दल आनंदी असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. सीएमआरएसच्या तीन अधिकाऱ्यांनी स्टेशनचे बांधकाम, स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट, अग्निरोधक उपाय, एस्केलेटर, लिफ्ट, विद्युत उपकरणे, टेलिकॉम, आपात्कालीन यंत्रणा व इतर सर्व सोयीसुविधांची पाहणी केली होती.८ मार्चला आभार दिनमहामेट्रो ८ मार्चला आभार दिन म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी नागपूरकरांना मेट्रोचा नि:शुल्क प्रवास घडणार आहे. प्रारंभी एकाच बाजूने सीताबर्डी ते खापरी असा १३.५ कि़मी. प्रवास राहणार आहे. त्यानंतर दोन्ही मार्गावर मेट्रो धावणार आहे. ९ मार्चला सकाळी ८ वाजेपासून सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक प्रवास एक महिना सवलतीचा सुरू होणार आहे. त्याकरिता मेट्रोने कॉमन मोबिलिटी कार्ड जारी केले आहे.
खापरी-सीताबर्डी मार्गावर पाच स्टेशन खुले राहणारउत्तर-दक्षिण कॉरिडोरमध्ये खापरी ते सीताबर्डी मार्गावर खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि सीताबर्डी हे पाच स्टेशन खुले राहणार आहे. प्रकल्प २१ ऑगस्ट २०१४ ला मंजूर झाला आणि त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बांधकाम १ जून २०१५ पासून सुरू होऊन ट्रायल टप्प्यात २७ महिन्यात पोहोचला. जवळपास ४४ महिन्यानंतर प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. प्रकल्पात ५ डी-बीम या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या बांधकामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे २० हजार कामगारांचा सहभाग आहे. देशात वेगात पूर्ण होणारा प्रकल्प म्हणून नोंद झाली आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे लाखो लोकांना प्रवासी सेवेचा लाभ मिळणार आहे.
प्रदर्शन व कॉफी टेबल बुकचे प्रकाशनप्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वी दुपारी ३.३० वाजता साऊथ एअरपोर्ट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाच्या बांधकामाचा लेखाजोखा दर्शविणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन आणि त्याचवेळी महामेट्रोच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी मेट्रो फिल्म शो दाखविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. नागपूर प्रकल्पाच्या बांधकामाची प्रत्यक्ष माहिती नागपूरकरांना प्रदर्शनाच्या माध्यमातून जाणून घेता येईल. पत्रपरिषदेत महामेट्रोचे महाव्यस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.