लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोचे विकास कार्य अधिक गतीने सुरू आहे. एलिव्हेटेड सेक्शनवर एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत १.५ कि.मी. ट्रॅकचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. या ट्रॅकची पाहणी करण्यासाठी या ट्रॅकवरून बुलंद शटर इंजिनचे औपचारिक प्रदर्शन करण्यात आले. रिच-१ मध्ये आतापर्यंत सहा कि़मी. रूळ टाकण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक (रिच-१) देवेंद्र रामटेककर यांनी पत्रकारांना बुधवारी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली.महामेट्रोच्या एकूण प्रकल्पात एलिव्हेटेड सेक्शनमधील हा पहिलाच प्रयोग असून एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्टदरम्यान हा एलिव्हेटेड सेक्शन आहे. यात वायाडक्टची उंची सुमारे ८ मीटर असून एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशनपर्यंत रिच-१ चा एलिव्हेटेड सेक्शन असणार आहे. एअरपोर्ट स्टेशन येथे रूळ टाकण्याचे कार्य सुरू असून आतापर्यंत ६ कि.मी.पर्यंत रूळ टाकण्यात आले आहेत. दोन रूळामधील अंतर १४३५ मिलीमिटर आहे.
एअरपोर्ट व जयप्रकाशनगरमेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यातएअरपोर्ट व जयप्रकाशनगरातील मेट्रो स्टेशनचे विकास कार्य अंतिम टप्प्यात असून अवघ्या काही दिवसांत या स्टेशनवर अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली असलेले कार्यालय सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर सुमारे ५०० मीटर अंतरावर वर्धा महामार्गाच्या मध्यभागी मोठ्या पिलरवर आधुनिक स्टेशन उभारण्यात येत आहे. २२३० वर्गमीटर इतक्या जागेवर एकूण २२ हे पिलरवर स्टेशन उभे राहत आहे. स्टेशनची लांबी ८० मीटर व रुंदी २६ मीटर आहे. याशिवाय पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठराविक अंतरावर मोठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनचे ६० टक्क्यांहून अधिक कार्य आतापर्यंत पूर्ण झाले आहे. यात स्टेशन आॅपरेटिंग रूम, जीपीएस तंत्रज्ञान, टेलिकॉम आणि सिग्नल देणारे तंत्रज्ञान सुविधा येथे असणार आहे. आधुनिक शैलीवर या स्टेशनचे बांधकाम होत आहे. २४०० वर्गमीटर जागेवर हे स्टेशन तयार करण्यात येत आहे. स्टेशनची उंची २५ मीटर असून ३ कॉनकोर्स तयार करून चौथ्या माळ्यावर प्लॅटफॉर्म असणार आहे.पाहणी दौऱ्यात यावेळी मुख्य निवासी अभियंता ए. बी. गुप्ता, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुशील कुमार, रहिवासी अभियंता ए.पी. शर्मा, उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळवे उपस्थित होते.