लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारी ठरते. मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन सांची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित आहे.भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची येथील जगप्रसिद्ध बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर या मेट्रो स्टेशनचे निर्माण करण्यात आले आहे. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकाने सांची येथे भव्य स्तूपाचे निर्माण करून शांतीचा मार्ग जगाला दाखवला. भारताच्या या गौरवशाली इतिहासाची ओळख प्राप्त करून देण्याचा संकल्प महामेट्रोने केला आहे. नागपूर मेट्रोच्या प्री-लॉन्च जॉय राईडदरम्यान न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची आकर्षक प्रतिमा पाहून नागरिकांनी या संकल्पनेची प्रशंसा केली.उल्लेखनीय म्हणजे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मपासून ४० मीटर उंचीवर बसविण्यात आलेल्या या डोमचा व्यास १३.५ मीटर आणि उंची ८.५ मीटर आहे. के्रेनच्या मदतीने २३ टन वजनी डोम बसविण्यात आला आहे. डोमचे डिझाईन आणि निर्माण कार्य सहा महिन्यात कुशल कारागिरांनी तयार केले आहे. डोम तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील धातूचा वापर करण्यात आला. पावसाच्या पाण्याचा डोमवर कुठलाही परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेण्यात येणार असून देखरेख खर्च शून्य आहे. डोमच्या आतील भागात पॉलीकार्बोनेटचा उपयोग झाला असल्याने अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून संरक्षण मिळेल. स्टेशन परिसरात व डोमच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसविण्यात आली आहे. मूर्ती सॅण्ड स्टोनपासून तयार केली आहे. न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशनचे बांधकाम आधुनिक आर्किटेक्ट पद्धतीने झाले आहे. यात क्रीम रंगातील टाईल्सचा उपयोग करण्यात आला आहे. तापमान नियंत्रित ठेवणाºया आधुनिक टेराकोटा टाईल्स अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे.